Join us  

रामकृष्ण नाईक यांना पणशीकर पुरस्कार

By admin | Published: November 06, 2015 2:24 AM

दी गोवा हिंदू असोसिएशन कला विभाग या संस्थेचे अध्वर्यु, ज्येष्ठ नाट्यकर्मी रामकृष्ण नाईक यांना नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, तर आपल्या अभिजात

मुंबई : दी गोवा हिंदू असोसिएशन कला विभाग या संस्थेचे अध्वर्यु, ज्येष्ठ नाट्यकर्मी रामकृष्ण नाईक यांना नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, तर आपल्या अभिजात अभिनयाने संगीत रंगभूमीवर मानाचे पान ठरलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री रजनी जोशी यांना कै. अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मराठी रंगभूमी दिनानिमित्त या पुरस्कारांची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी केली. हे पुरस्कार सन २०१५-२०१६ या वर्षासाठीचे असून पुरस्काराचे स्वरूप ५ लाख रुपये, शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे आहे.रामकृष्ण नाईक यांनी आपल्या संस्थेमार्फत रायगडाला जेव्हा जाग येते, संगीत मत्स्यगंधा, लेकुरे उदंड झाली, अखेरचा सवाल, नटसम्राट, संगीत मीरा मधुरा, तुझा तू वाढवी राजा, बॅरिस्टर आणि धन्य ती गायनी कला आदी नाटके रंगमंचावर आणली आहेत. किर्लोस्कर पुरस्काराच्या मानकरी ठरलेल्या रजनी जोशी यांनी आजवर संगीत नाटकांतून विशेषत: साहित्य संघाच्या नाटकांमध्ये अभिनय केला आहे. त्या १९६३ पासून व्यावसायिक संगीत रंगभूमीवर काम करत आहेत. संगीत सौभद्र, स्वयंवर, मृच्छकटिक, संशयकल्लोळ, पुण्यप्रभाव, एकच प्याला, मंदारमाला, मानापमान आदी विविध नाटकांतील त्यांनी रंगवलेल्या नायिकेच्या भूमिका विशेष गाजल्या आहेत.रामकृष्ण नाईक आणि रजनी जोशी यांनी मराठी रंगभूमीला अतुलनीय असे योगदान दिले आहे. पाच लाख रुपये, शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे त्यांना जाहीर झालेल्या पुरस्काराचे स्वरूप आहे.