रामचंद्र करंजुलेला १० वर्षांची सक्तमजुरी
By admin | Published: March 12, 2016 04:01 AM2016-03-12T04:01:03+5:302016-03-12T04:01:03+5:30
नवी मुंबईच्या ‘कल्याणी महिला बाल सेवा संस्थे’चा संस्थापक रामचंद्र करंजुले याला सत्र न्यायालयाने १९ मूकबधिर व गतिमंद मुलींवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी फाशीची शिक्षा ठोठावली होती
मुंबई : नवी मुंबईच्या ‘कल्याणी महिला बाल सेवा संस्थे’चा संस्थापक रामचंद्र करंजुले याला सत्र न्यायालयाने १९ मूकबधिर व गतिमंद मुलींवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी फाशीची शिक्षा ठोठावली होती. शुक्रवारी उच्च न्यायालयाने करंजुलेची फाशीची शिक्षा रद्द करत त्याला १० वर्षांची सक्त कारावासाची शिक्षा ठोठावली. त्याच्यासह अन्य दोन जणांना ठोठावलेली जन्मठेपेची शिक्षाही उच्च न्यायालयाने रद्द केली. मात्र याही निर्णयाविरोधात करंजुले सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे.
सत्र न्यायालयाने रामचंद्र करंजुले (५७) याला एका अल्पवयीन मुलीची हत्या आणि अन्य पाच जणींवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी २१ मार्च २०१३ रोजी फाशीची शिक्षा ठोठावली. या निर्णयाविरुद्ध करंजुलेने उच्च न्यायालयात धाव घेतली. ‘अर्जदाराची (रामचंद्र करंजुले) भादंवि कलम ३०२ (हत्या) मधून मुक्तता करण्यात येत आहे. मात्र त्याला भादंवि कलम ३७६ (२) (सी) आणि ३७६ (२) (जी) (सामूहिक बलात्कार) प्रकरणी दोषी ठरवण्यात येते. त्यानुसार त्याला १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व प्रत्येकी ५० हजार रुपयांचा दंड, अशी शिक्षा ठोठावण्यात येत आहे,’ असे खंडपीठाने म्हटले.
रामचंद्र करंजुलेव्यतिरिक्त उच्च न्यायालयाने रामचंद्रचा पुतण्या नाना करंजुले, खंडू कसबे (रामचंद्रचे मदतनीस) सोनाली बदादे (आश्रमशाळेची अधीक्षक) आणि पार्वती मावळे (केअर टेकर) यांनाही या प्रकरणी दोषी ठरवले. तर करंजुलेचा अन्य एक सहकारी प्रकाश खडके याला सर्व आरोपांतून मुक्त केले.
नाना करंजुले याला आयपीसी कलम ३५४ (विनयभंग) अंतर्गत दोषी ठरवत त्याला दोन वर्षांची शिक्षा ठोठावली. मात्र नाना याने खटला सुरू असतानाच त्याची शिक्षा भोगली आहे. तर आश्रमशाळेची अधीक्षक सोनाली बदादे हिची हत्येच्या आरोपातून मुक्तता करत तिला एक वर्षाची सक्त कारावासाची शिक्षा ठोठावली. (प्रतिनिधी)सर्वोच्च न्यायालयात जाणार
‘आदेशात चूक असल्याचे स्पष्ट लक्षात येते. न्यायदान प्रक्रिया योग्य प्रकारे झाले नाही. त्यामुळे हा आदेश रद्द करण्यात यावा,’ अशी विनंती बचाव पक्षाच्या वकिलांनी केली होती. आरोपींतर्फे अॅड. निरंजन मुंदरगी, अॅड. महेश वासवानी, धरणी नागदा, श्याम मुल्ला, अनुश्री कुलकर्णी, विक्रम सुतारिया, ओमकार मुळेकर, लता शानबाग आणि शिशीर हिरे यांनी युक्तिवाद केला. करंजुले निर्दोष असून आम्ही याही निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ, असे अॅड. महेश वासवानी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.