मुंबई - आपल्या भाषणातील कवितांमुळे देशभर प्रसिद्ध असलेले नेते आणि केंद्रीयमंत्री रामदास आठवलेंना ग्रेटेस्ट लिडर्सचा अवॉर्ड देण्यात आला आहे. आठवलेंच्या नेतृत्वाची देशपातळीवर दखल घेण्यात आली आहे. ‘इंडियाज ग्रेटेस्ट ब्रँड अँड लिडर्स अवॉर्ड’ (India’s Greatest Brand and Leaders Award) ने आठवलेंना सन्मानित करण्यात आले.
आठवलेंनीच आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याबाबत माहिती दिली आहे. मात्र, हे त्यांचे अधिकृत ट्विटर अकाऊंट असल्याचा उल्लेख ट्विटरवर नाही. मुंबईतील वांद्रे परिसरातील ताज लँड एन्ड येथे एशियन बिझनेस आणि सोशल फोरमचं बारावं अधिवेशन नुकतंच आयोजित करण्यात आलं होतं. फोरमच्या या बाराव्या अधिवेशनात रामदास आठवले यांचा ‘इंडियाज ग्रेटेस्ट ब्रँड अँड लिडर्स अवॉर्ड’ने गौरव करण्यात आला. यावेळी जगभरातील उद्योजक आणि समाजसेवक उपस्थित होते. या कार्यक्रमात आठवलेंच्या हस्ते अनेक दिग्गज उद्योजकांनाही पुरस्कार देण्यात आला.
रामदास आठवलेंचा चातुर्य म्हणजे एकही आमदार नसताना, एकही खासदार नसताना ते केंद्रीय मंत्री बनले आहेत. विशेष म्हणजे ते स्वत:ही निवडणूक लढवून खासदार झाले नाहीत. भाजपाकडून त्यांना राज्यसभेवर घेण्यात आले आहे. त्यामुळे, राजकारणातील त्यांच्या याच शैलीची दखल आयोजकांना घेतली असावी, अशी चर्चा या पुरस्कारानंतर सुरू आहे. कारण, रामदास आठवलेंच्या कुठल्याही कार्याचा उल्लेख पुरस्कार देताना करण्यात आला नाही. आठवले हे रिपल्बिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. मात्र, त्यांच्या पक्षाचा एकही आमदार किंवा खासदार जनतेतून निवडूण आलेला नाही. सध्या ते सरकारमधील भाजपचे मित्रपक्ष बनून काम करतात.