उदयनराजेंना निवडून आणू, त्यांनी रिपाइंत यावं; रामदास आठवलेंची ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 03:58 PM2018-10-08T15:58:41+5:302018-10-08T16:01:02+5:30
सगळ्यांचंच लक्ष राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घोषणेकडे लागलं असताना, इकडे उदयनराजेंना दोन ऑफर आल्या आहेत. त्यातली एक रिपाइंचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिलीय.
मुंबईः छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळणार की नाही, यावरून तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादीच्या एका गटाने उदयनराजेंच्या विरोधात झेंडा फडकवलाय आणि रामराजे नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी देण्याची मागणी केलीय. त्यामुळे सगळ्यांचंच लक्ष राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घोषणेकडे लागलं असताना, इकडे उदयनराजेंना दोन ऑफर आल्या आहेत. त्यातली एक रिपाइंचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिलीय, तर नितेश राणेंनी उदयनराजेंना महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात येण्याचं आमंत्रण दिलंय.
'उदयनराजेंना राष्ट्रवादी काँग्रेसचं तिकीट मिळण्याची शक्यता कमीच आहे. त्यांच्याऐवजी श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी मिळू शकते. त्यामुळे माझी त्यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या पक्षात यावं, आम्ही उदयनराजेंना निवडून आणू. या संदर्भात मी त्यांना फोनही करणार आहे', असं रामदास आठवले यांनी जाहीरपणे सांगितलं.
दुसरीकडे, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षही उदयनराजेंच्या स्वागतासाठी सज्ज आहे. नारायण राणेंचे चिरंजीव नितेश राणे यांनी ट्विटरवरून त्यांना बोलावणं पाठवलं आहे. 'उदयनराजे एक ताकदीचे नेते आहेत, आमचे चांगले मित्र आहेत. मी लवकरच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात जातोय, त्यांचंही स्वागत आहे', असं ट्विट नितेश राणेंनी केलंय.
उदयनराजे एक ताकदवर नेते आहेत..आमचे चांगले मित्र आहेत..
— nitesh rane (@NiteshNRane) October 8, 2018
मी लवकरच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षत जात आहे ..
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात त्यांच ही स्वागत आहे!
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी पक्षाच्या नेत्यांची एक बैठक झाली. उदयनराजे आपल्या समर्थकांसह या बैठकीला उपस्थित होते. परंतु, त्यांच्या उमेदवारीवर अजूनही टांगती तलवारच आहे. 'पवार साहेबां'चा निर्णय आपल्याला मान्य असेल, असं सांगतानाच, इतरही पक्षात माझे मित्र आहेत, असा सूचक इशारा उदयनराजेंनी दिला होता. त्यापैकीच दोन मित्र - रामदास आठवले आणि नितेश राणे लगेचच पुढे सरसावले आहेत. आता उदयनराजे कुणाला 'टाळी' देतात, की पवारच या शिलेदाराच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालतात, याबद्दल उत्सुकता वाढली आहे.