मुंबई - जगभरात आज गौतम बुद्ध यांची जयंती साजरी करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यापर्यंत सर्वच दिग्गजांनी बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, गौतम बुद्ध यांनी दिलेल्या शांतीच्या संदेशाची आठवणही करुन दिली. केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी राज्यपालांची भेट घेऊन त्यांना गौतम बुद्धांची मूर्ती भेट दिली.
भगवान बुद्धांचे अहिंसा, शांती, करुणा व उपेक्षितांची सेवा हे संस्कार भारतीय समाजमनावर शतकानुशतके रुजले आहेत. कोरोनामुळे आज जग आव्हानात्मक परिस्थितीतून जात असताना भगवान बुद्धांची व्यापक समाज हिताची शिकवण विशेष प्रासंगिक असल्याचे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. तर, रामदास आठवलेंनी राजदरबारी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन बुद्ध मूर्ती सप्रेम भेट दिली. यावेळी पूज्य भिक्खू संघाला कठीण चिवरदान राज्यपालांच्या हस्ते करण्यात आल्याचेही रामदास आठवले यांनी सांगितले. आठवले यांच्या ट्विटर हँडलवरुन यासंदर्भातील फोटो शेअर करण्यात आले आहेत.
मुख्यमंत्र्यांचा संदेश
तथागत गौतम बुद्धांची शांती, प्रज्ञा आणि करुणेचा संदेश आज जगासाठी मार्गदर्शक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. तथागतांच्या जीवनातूनच आपल्याला आव्हानांवर मात करण्याची दिशा मिळते. त्यांनी दिलेला प्रज्ञा, शील, करुणेचा संदेश आजच्या घडीला अधिक समर्पक आहे. यातच त्यांच्या विचारांची सार्वकालिकता आहे. बुद्धपौर्णिमेनिमित्त तथागत भगवान गौतम बुद्धांना कोटी कोटी प्रणाम आणि या पवित्र पर्वानिमित्त राज्यातील जनतेला हार्दिक शुभेच्छा, असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटले.