लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली कार सापडल्याप्रकरणी सचिन वाझेच्या अटकेनंतर भाजप नेत्यांकडून राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी केली जात आहे. नारायण राणे यांनी त्यासाठी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठविल्यानंतर आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही तशीच मागणी केली आहे.
लाखो लोकांना रोजगार देणारे उद्योजक अंबानी यांचे घर उडविण्याच्या षडयंत्रामागे कुणाचा हात आहे याची सखोल चौकशी व्हायला हवी. अशा दहशतवादी गुन्हे प्रकरणात वाझेसारख्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव येत असल्याने राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी रिपब्लिकन पक्षाची मागणी असून त्यासाठी आपण लवकरच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठविणार असल्याचे आठवले यांनी सांगितले. एनआयएने चौकशी केली नसती तर वाझे प्रकरण दडपले गेले असते. वाझे यांचा शिवसेनेशी अनेक वर्षे संबंध राहिला आहे, असा आराेपही त्यांनी केला.