“नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले की मी पुन्हा मंत्री होणार हे निश्चित”; रामदास आठवलेंना विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2024 01:53 PM2024-03-10T13:53:50+5:302024-03-10T13:55:28+5:30

Ramdas Athawale News: २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत नक्कीच नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार आहेत, असे रामदास आठवलेंनी म्हटले आहे.

ramdas athawale claim once narendra modi becomes pm i will definitely become a minister again | “नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले की मी पुन्हा मंत्री होणार हे निश्चित”; रामदास आठवलेंना विश्वास

“नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले की मी पुन्हा मंत्री होणार हे निश्चित”; रामदास आठवलेंना विश्वास

Ramdas Athawale News: नरेंद्र मोदी अनेकदा मुंबईत आले आहेत. भारत सरकारच्या वतीने हजारो कोटींची मदत मुंबई आणि महाराष्ट्राला दिली आहे. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत नक्कीच नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार आहेत आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, की मी मंत्री होणार हे सत्य आहे, निश्चित आहे, असा मोठा विश्वास केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा मंत्री होण्याबाबत दावा केला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतून कमीत कमी दोन जागा मिळाव्यात, यासाठी रामदास आठवले आग्रही आहेत.अवघ्या काही दिवसांत लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. जागावाटप आणि उमेदवारी यांवरून अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहे. यातच रामदास आठवले यांनी मंत्रिपदाबाबत सदर दावा केला आहे. 

संविधानाचे संरक्षण करण्यासाठी आपण सगळे आहोत

नरेंद्र मोदींनी नवीन संसद भवनाला ‘संविधान सदन’ हे नाव दिले आहे. २६ नोव्हेंबर हा दिवस देशभर संविधान दिन म्हणून देशभर पाळण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे असे नरेंद्र मोदी संविधान बदलणे शक्य नाही. संविधानाचे संरक्षण करण्यासाठी आपण सगळे आहोतच, असे रामदास आठवले म्हणाले. तत्पूर्वी, महायुतीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जागावाटपाची चर्चा सुरू आहे. रिपाइंनेही सोलापूर आणि शिर्डी दोन जागांची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. राज्यसभेत खासदार असलो तरी लोकसभा लढवावी, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. २००९ मध्ये शिर्डीतून माझा पराभव झाला होता. शिर्डीतून पुन्हा निवडून यायचे असल्याचा मानस रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मीडियाशी बोलताना रामदास आठवले यांनी सांगितले की, शिवसेना-भाजपा युती २७ वर्षे होती. २०१२ च्या मुंबई महापालिका निवडणुकीत रिपाइं सोबत आल्यानंतर युतीची महायुती झाली. आता मोठे मित्रपक्ष आल्यानंतर आमचे नाव कुठे येत नाही. रिपाइंचा मतदार इमानदार असून मी घेतलेल्या भुमिकेला पाठिंबा देणारा आहे. रिपाइं छोटा पक्ष असला तरी गावा-गावात कार्यकर्त्यांची फळी आहे. या कार्यकर्त्यांनाही संधी मिळावी, अशी अपेक्षा आठवले यांनी व्यक्त केली. 
 

Web Title: ramdas athawale claim once narendra modi becomes pm i will definitely become a minister again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.