...मग का घेताहेत आढेवेढे?; रामदास आठवलेंचे उद्धव ठाकरेंना कवितेतून साकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2019 09:08 PM2019-11-02T21:08:30+5:302019-11-02T21:09:05+5:30
रामदास आठवले यांनी भाजपा आणि शिवसेना यांच्यातील सत्ता संघर्षावर भाष्य केले.
मुंबई : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्यासह महायुतीतील घटक पक्षातील नेत्यांनी शनिवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन भाजपाला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रित करावे, अशी विनंती केली. त्यानंतर रामदास आठवले यांनी प्रसार माध्यमांशी चर्चा केली.
यावेळी रामदास आठवले यांनी भाजपा आणि शिवसेना यांच्यातील सत्ता संघर्षावर भाष्य केले. तुम्ही कवी आहात. कवितेच्या माध्यमातून भाजपा आणि शिवसेनेची समजूत काढा, असे राज्यपालांनी सांगितले आहे, असे म्हणत रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत म्हटले की, "शिवसेनेने सत्तेवर येण्यासाठी फार मोठे दिलेत लढे, मग का घेताहेत उद्धव ठाकरे आढेवेढे... आढेवेढे घेऊन नुकसान होणार आहे..."
याचबरोबर, आदित्य ठाकरे यांना अनुभव नसल्यामुळे त्यांना मुख्यमंत्री केल्यानंतर राज्य कसे चालणार असा सवाल करत मुख्यमंत्रिपदाबाबत भविष्यात काही होणार असेल, तर उद्धव ठाकरेंनी विचार केला पाहिजे, असे म्हटले आहे. याशिवाय, शिवसेनेने काँग्रेससोबत जाणे योग्य नाही, शिवसेनेने भाजपासोबत जायला हवे. भाजपाची ऑफर स्वीकारुन शिवसेनेने सत्तेत यावे, असे आवाहन रामदास आठवले यांनी शिवसेनेला केले आहे.
भाजपा आणि शिवसेना यांच्यातील 50-50 फॉर्म्युल्यावरही रामदास आठवले यांनी यावेळी भाष्य केले. 50-50 जागांबाबत बोलणी झाली होती, मुख्यमंत्रीपदाबाबत काहीही चर्चा नव्हती. ज्यांच्या जागा जास्त त्यांचा मुख्यमंत्री हाच फॉर्म्युला आत्तापर्यंतचा इतिहास आहे. हरयाणा, कर्नाटकमध्येही तसाच फॉर्म्युला आहे. मुख्यमंत्री अडीच-अडीच वर्षांचा असा प्रयोग देशात कधीही झाला नाही. त्यामुळे शिवसेनेने ही आग्रही मागणी करू नये, असेही रामदास आठवले यांनी सांगितले.