मुंबई : विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही अद्याप राज्यात सरकार स्थापन झाले नाही. भाजपा आणि शिवसेना यांच्यातील सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप सुटला नाही. मुख्यमंत्रीपदासह सत्तेत समान वाटा पाहिजे, म्हणून शिवसेना अडून बसली आहे. याविषयी बोलताना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
रामदास आठवले यांच्यासह महायुतीतील घटक पक्षातील नेत्यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन भाजपाला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रित करावे, अशी विनंती केली. त्यानंतर रामदास आठवले यांनी प्रसार माध्यमांशी चर्चा केली. यावेळी आदित्य ठाकरे यांना अनुभव नसल्यामुळे त्यांना मुख्यमंत्री केल्यानंतर राज्य कसे चालणार असा सवाल करत मुख्यमंत्रिपदाबाबत भविष्यात काही होणार असेल, तर उद्धव ठाकरेंनी विचार केला पाहिजे, असे म्हटले आहे.
याशिवाय, शिवसेनेने काँग्रेससोबत जाणे योग्य नाही, शिवसेनेने भाजपासोबत जायला हवे. भाजपाची ऑफर स्वीकारुन शिवसेनेने सत्तेत यावे, असे आवाहन रामदास आठवले यांनी शिवसेनेला केले आहे. तसेच, रामदास आठवले यांनी भाजपा आणि शिवसेना यांच्यातील 50-50 फॉर्म्युल्यावरही भाष्य केले. 50-50 जागांबाबत बोलणी झाली होती, मुख्यमंत्रीपदाबाबत काहीही चर्चा नव्हती. ज्यांच्या जागा जास्त त्यांचा मुख्यमंत्री हाच फॉर्म्युला आत्तापर्यंतचा इतिहास आहे. हरयाणा, कर्नाटकमध्येही तसाच फॉर्म्युला आहे, असे रामदास आठवले यांनी सांगितले.
याचबरोबर, मुख्यमंत्री अडीच-अडीच वर्षांचा असा प्रयोग देशात कधीही झाला नाही. त्यामुळे शिवसेनेने ही आग्रही मागणी करू नये, असे रामदास आठवले यांनी सांगितले. याशिवाय, 1995 मध्ये शिवसेनेच्या जागा जास्त होत्या, म्हणून त्यांचा मुख्यमंत्री झाला. मात्र, सद्दस्थितीत आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होण्याबाबत शिवसेनेचा आग्रह योग्य नाही, असेही रामदास आठवले यांनी म्हटले आहे.