मुंबई - रिपाइंचे प्रमुख आणि केंद्रीयमंत्री रामदास आठवले हे आपल्या बिनधास्तपणामुळे नेहमीच चर्चेत असतात. कधी कवितांमुळे, कधी बिनधास्त वक्तव्यांमुळे, कधी त्यांनी घेतलेल्या भूमिकांमुळे तर कधी त्यांच्यात दडलेल्या कलाकारामुळे रामदास आठवले अनेकांच्या आवडीचे नेते आहेत. विशेष म्हणजे सोशल मीडियावर त्यांना अनेकदा ट्रोल करण्यात येतं. मात्र, आपल्यावर होणाऱ्या ट्रोलिंगलाही ते मजेशीरपणे आणि दिलखुलासपणे घेतात. त्यामुळेच, त्यांच्या वागण्या-बोलण्याचं कौतुकही होत असतं. आता, रामदास आठवेंनी बिबट्यालाच दत्तक घेतलं आहे.
रामदास आठवले यांनी आपल्या आयुष्यातील संघर्षाचा काळ दलित पँथर नावाच्या चळवळीत स्वत:ला वाहून केला. सांगली जिल्ह्यातील एका लहानशा खेड्यात राहणारा रामदास या चळवळीच्या आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची, विचारांची शिदोरी घेऊन केंद्रीय मंत्र्यांपर्यंत पोहोचला. मात्र, आजही अनेकदा त्यांच्यातील तो धडपड्या, चळवळीतील कार्यकर्ता जागोजागी पाहायला मिळतो. दलित पँथर या संघटनेच्या लोगोतच पँथर होता, काळा बिबट्या होता. आता, रामदास आठवलेंनी मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय प्राणीसंग्रहालयातून एक बिबट्याला दत्तक घेतले आहे. ''वन्यप्राणी दत्तक योजनेनुसार मुंबईतील नॅशनल पार्कमधून बिबट्या पँथर दत्तक घेतल्याचे रामदास आठवलेंनी सांगितले. तसेच, प्राणिमात्रांवर प्रेम करा, निसर्गावर प्रेम करा...'' असा संदेशही त्यांनी दिला. त्यांनी बिबट्याचं नावही पँथर ठेवलं आहे.
भोंग्याबाबत आठवलेंची भूमिका स्पष्ट
"भोंग्याला विरोध करण्याचे काहीही कारण नाही. भगवा हे शांततेचे प्रतीक आहे. जर राज ठाकरेंनी अंगावर भगवा चढवला असेल, तर त्यांनी शांततेचा मार्ग स्वीकारावा. त्यांनी कोणाच्या भावना दुखावू नयेत. मंदिरावर भोंगे लावण्यास आमचा विरोध नाही. मात्र मशिदींवरील भोंगे उतरविण्यास आमचा विरोध आहे. त्याचप्रमाणे मौलानांनीही चुकीचे वक्तव्य करू नये. धमकीवजा भाषेचा वापर होणे योग्य नाही. त्यांनी मुस्लिमांना भडकवू नये व मुस्लिम समाजानेही त्यांचे ऐकू नये, असे माझे आवाहन आहे. कुराण शांततेचा मार्ग सांगतो. आपण हिंसेची भाषा करणे साफ चूक आहे."