Ramdas Athawale News: सुशांत सिंग राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियन मृत्यू प्रकरण तब्बल पाच वर्षानंतर आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. दिशाच्या वडिलांनी मुलीच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची विनंती केली आहे. या प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याची मागणी सतीश सालियन यांनी याचिकेद्वारे मुंबई उच्च न्यायालयाकडे केली आहे. या याचिकेत दिशा सालियनच्या वडिलांनी ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे. यावरून आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत असून, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी या प्रकरणावर भाष्य केले आहे.
आदित्य ठाकरे, डिनो मारियो हे दोन ते तीन तास दिशा सालियानच्या फ्लॅटवर होते. अशा काही सिक्रेट बाबी समोर आल्या आहेत, त्यामुळे आदित्य ठाकरेला तात्काळ अटक होऊ शकते, अटक झाली पाहिजे. आरोपींचा असा दबदबा चालणार नाही. निष्पक्ष कारवाई होऊ शकते, त्या ठिकाणी ही केस ट्रान्सफर करावी. ही आमची मागणी आहे. आदित्य ठाकरे, सूरज पांचोली आणि इतर यांच्याविरोधात सामूहिक बलात्कार, हत्या अशा विविध कलमांखाली गुन्हे दाखल करावेत. कस्टडी घेण्यात यावी. यांची लाय डिटेक्टर, नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग टेस्ट घेण्यात यावी. आरोपीला मृत्यूदंड होईल, हे सुनिश्चित करावे ही आमची प्रमुख मागणी आहे, असे या प्रकरणातील वकील निलेश ओझा म्हणाले.
या प्रकरणात उद्धव ठाकरे यांचे सरकार असताना चर्चा झाली
रामदास आठवले यांनी सांगितले की, दिशा सालियान हिचा मृत्यू हा अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याची तक्रार तिच्या आई वडिलांनी केली आहे. त्यामुळे या प्रकरणात उद्धव ठाकरे यांचे सरकार असताना चर्चा झाली होती. आदित्य ठाकरे यांचा यामध्ये समावेश आहे की नाही याबाबत मला माहिती नाही किंवा आदित्य ठाकरे यांना या प्रकरणात टार्गेट करण्याची कोणतीच भूमिका आमची नाही. परंतु दिशा सालियान हिच्या आई वडिलांनी केलेल्या तक्रारीवर या प्रकरणातील चौकशी होणे गरजेचे आहे. या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचा समावेश असेल असे मला अजिबात वाटत नाही. यासंदर्भातील चौकशी ही निःपक्षपातीपणे होणे गरजेचे आहे. शिवाय आदित्य ठाकरे यांना यामध्ये टार्गेट करू नये, असे आवाहन रामदास आठवले यांनी केले. ते एबीपी माझाशी बोलत होते.
दरम्यान, सदर घटनेनंतर अनेक राजकारणी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी अचानक सक्रिय झाले. या घटनेनंतर आदित्य ठाकरे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी फोनवरून सतत संपर्कात होते. याशिवाय दिशाच्या जवळच्या काही व्यक्तींनाही त्यांनी अनेक फोन कॉल्स केले. दिशाच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी सुशांत सिंह राजपूत याचाही मृत्यू झाला. याच कालावधीत रिया चक्रवर्तीसोबत आदित्य ठाकरेंनी ४४ वेळा फोनवर बोलणे केल्याचाही आरोप याचिकेद्वारे करण्यात आला आहे.