'...तर भाजपा, शिवसेना, आरपीआयने सरकार स्थापन केलं असतं'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2020 12:49 PM2020-01-02T12:49:09+5:302020-01-02T13:01:18+5:30
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जनतेने विरोधी पक्ष म्हणून मतदान केलं होतं.
नवी दिल्ली: महाविकास आघाडीचा मंत्रिमंडळ विस्तार सोमवारी पार पडला असून आज खातेवाटप देखील करण्यात येणार असल्याचे बोलण्यात येत आहे. मात्र शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस तीन भिन्न विचारसारणीच्या पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केल्यानंतर भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीचे सरकारची तुलना तीन चाकी रिक्षाशी केली होती. तसेच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील तीन चाकांचे सरकार जास्त काळ धावू शकणार नाही असा टोला महाविका आघाडीच्या सरकारला लगावला आहे.
रामदास आठवले म्हणाले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जनतेने विरोधी पक्ष म्हणून मतदान केलं होतं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आम्हाला जनतेने विरोधी पक्ष म्हणून कौल दिला असल्याचे वारंवार सांगत होते मग शिवसेनेसोबत सरकार स्थापन करायला नको होतं असं मत रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे. तसेच जर राष्ट्रवादी आणि काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा दिला नसता तर भाजपा, शिवसेना, आरपीआयचे सरकार सत्तेत आले असते असं देखील रामदास आठवले यांनी सांगितले.
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीचे सरकार सत्तेत आले असले तरी मला वाटत नाही की महाविकास आघाडीचे सरकार फार काळ टिकेल. महाविकास आघाडीचे सरकार तीन चाकी रिक्षा असून सरकारला चार चाकांची आवश्यकता होती असं मत व्यक्त केलं आहे.
Union Minister Ramdas Athawale: The three parties (Shiv Sena-NCP-Congress) have come together but I don't think the three-wheeler can run long. I think there was requirement of a four-wheeler. #Maharashtra (1.1.20) pic.twitter.com/PGYBRi7NtK
— ANI (@ANI) January 1, 2020
देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत असलेले सरकार तीन चाकी रिक्षा सारखे असल्याचे सांगत महाविकास आघाडीला टोला लगावला होता. तसेच प्रत्येक कामाला स्थगिती देण्याचं काम सरकारकडून सुरू आहे. 'स्थगिती सरकार' अशी प्रतिमा होणं धोकादायक असल्याचे सांगत ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता. देवेंद्र फडणवीस यांच्या तीन चाकी रिक्षा सरकार असल्याच्या टीकेवर गरिबांना बुलेट ट्रेन नाही, तर तीन चाकी रिक्षाच परवडत असल्याचे प्रत्युत्तर उद्धव ठाकरे यांनी दिले होते.