मुंबई-
राज्यात किराणा दुकान, सुपर मार्केट आणि मॉल्समध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी टीका केली आहे. 'किराणा दुकानात आला दारूचा माल, आता लोकांचे होणार हाल...', अशा काव्यमय शब्दात रामदास आठवले यांनी ठाकरे सरकारच्या निर्णयाची खिल्ली उडवली आहे.
राज्यातील १ हजार स्वेअर फूटापेक्षा अधिक जागा असलेल्या सुपर मार्केट, किराणा दुकान आणि मॉल्समध्ये वाईनची विक्री करता येणार असल्याच्या नव्या वाईन विक्री धोरणाला राज्य सरकारनं मंत्रिमंडळ बैठकीत हिरवा कंदिल दाखवला आहे. ठाकरे सरकारच्या याच निर्णयावर प्रमुख विरोधीपक्ष भाजपाकडून जोरदार विरोध सुरू असतानाच रामदास आठवले यांनीही या प्रकरणात उडी घेत सरकारवर टीका केली.
राजभवनात आज पर्यावरण पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. पर्यावरण क्षेत्रात चांगली कामगिरी केलेल्यांना पर्यावरण पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं. या सोहळ्याला रामदास आठवले देखील उपस्थित होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आठवले यांनी ठाकरे सरकारच्या नव्या वाईन विक्री धोरणावर टीका केली. किराणा दुकानात आला दारूचा माल...लोकांचे होणार हाल.. अशा कवितेच्या ओळी ऐकवत त्यांनी राज्य सरकारच्या निर्णयाचा विरोध दर्शवला. सरकारच्या या निर्णयाविरोधात आरपीआय आंदोलन करेल, असा इशारा देखील आठवले यांनी दिला आहे.
महापालिका निवडणुकीत शिवसेनेला शह देऊमुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला शह देऊ असा विश्वास देखील रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केला. एप्रिल महिन्यात महापालिका निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. भाजपा आणि आरपीआय निवडणूक जिंकेल. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस वेगळे निवडणूक लढतील यामुळे भाजपा आणि आरपीआय शिवसेनाला पराभूत करू, असं आठवले म्हणाले.