मुंबई:समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक (nawab malik) यांनी केलेले आरोप अत्यंत चुकीचे आणि पूर्वग्रह दूषित खोडसाळ आहेत. नवाब मलिक आमचे मित्र आहेत पण तरीही त्यांनी समीर वानखेडे यांच्या बाबतीत घेतलेली भूमिका चुकीची आहे. समीर वानखेडे (sameer wankhede) यांचे चारित्र्यहनन करण्याचे काम नवाब मलिक यांनी थांबावावे आणि त्यांना जातीय व धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करू नये. समीर वानखडे यांच्या जीवितास धोका होऊ नये. त्यांना राज्य सरकारने संरक्षण द्यावे. समीर वानखडे या कर्तबगार अधिकाऱ्याच्या केसाला ही धक्का लागला तर याद राखा, असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (ramdas athawale) यांनी दिला. मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत ना रामदास आठवले बोलत होते.
आर्यन खानविरोधात सबळ पुरावे मिळाले आहेत. त्यामुळे न्यायालयात अद्याप जामीन मिळालेला नाही. कारवाई करताना पुरावे नसते तर न्यायालयाने तात्काळ आर्यन खानला जमीन दिला असता. याबाबत समीर वानखडे यांनी केलेली कारवाई योग्य आहे. समीर वानखडे यांनी कोणतेही चुकीचे काम केलेले नाही. ड्रग्सच्या विळख्यातून युवा पिढीला वाचविण्याचे काम नारकोटिक्स विभाग करीत आहे. तेच काम समीर वानखडे करीत आहे. युवा पिढीला ड्रग्सच्या विळख्यातून वाचविण्याचे काम देशहिताचे असून, असे चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्रास देणे योग्य नसून उलट आशा अधिकाऱ्यांच्या समर्थनासाठी पुढे आले पाहिजे. त्यामुळे समीर वानखडे यांच्या केसाला ही धक्का लागला तर रिपब्लिकन पक्ष रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही, असेही रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
सत्तेचा गैरवापर नवाब मलिक करतायत
तसेच समीर वानखेडे हे IRS नार्कोटिकस कंट्रोल ब्युरो या सेलचे प्रमुख अधिकारी आहेत. आत्तापर्यंत त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक झाले आहे. परंतु मंत्री नवाब मलिक यांच्या जावयावर यापूर्वी समीर वानखडे यांनी कारवाई केली असल्यामुळे त्यांचा राग मनात धरून समीर वानखडे यांना नामोहरम करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी आणि नवाब मलिक यांनी केलेला आहे. त्यासाठी सत्तेचा गैरवापर नवाब मलिक आणि महाविकास आघाडी सरकार करीत आहे, असा आरोप रामदास आठवले यांनी केला आहे.
नवाब मलिक यांच्या भूमिकेमुळे तणाव वाढत आहे
अशा प्रकाराचा एखादा गंभीर निर्णय घेणे हा त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांसोबत घेतलेली सामूहिक प्रक्रिया आहे. त्या निर्णयासाठी फक्त समीर वानखडे या मागासवर्गीय अधिकाऱ्याला जबाबदार धरणे चुकीचे आहे. नवाब मलिक यांच्या जावयावर झालेली कारवाई हा समीर वानखेडे यांच्या कर्तव्याचा भाग होता. नवाब मलिक यांच्या भूमिकेमुळे तणाव वाढत आहे आणि जाणीवपूर्वक नवाब मलिक या प्रश्नाला धार्मिक रंग देत आहेत. समीर वानखडे हे मागासवर्गीय अधिकारी असून यांच्यावर अशा प्रकारचे आघात होणार असतील तर आम्ही समीर वानखडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असे रामदास आठवले म्हणाले.