मुंबई : केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर रामदास आठवले यांनी ट्विट करत त्यांना हा काळजीचा सल्ला दिला आहे.
“अनिल देशमुखजी आप कोरोना से मत डरोना, मैने तो बोला है गो कोरोना, कोरोना से मत हरोना”, असे ट्विट रामदास आठवले यांनी केले आहे. या ट्विटला अनेक युजर्सनी त्यांना भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी मीम्सद्वारे त्यांच्या या पोस्टला प्रतिक्रिया दिली आहे तर अनेकांनी त्यांच्या काळजीवाहू स्वभाव असल्याचे सांगत कौतुक केले आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण झाली आहे. शुक्रवारी त्यांनी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे ट्विटद्वारे सांगितले होते. "आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. तरी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे मी आवाहन करतो. लवकरच मी कोरोनावर मात करून पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईल", असे अनिल देशमुख यांनी ट्विट केले होते.
दरम्यान, गेल्या तीन महिन्यांपूर्वी कोरोना व्हायरस विरोधात 'गो कोरोना, कोरोना गो' अशी घोषणा देणारे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी अनिल देशमुख यांनीही रामदास आठवले यांच्याच खास स्टाइलमध्ये त्यांना बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. अनिल देशमुखांनी रामदा आठवलेंना चारोळीच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या होत्या.
"कोरोना-गोचा घेतला ज्याने वसा, ग्रासले त्याच कविमित्र रामदासा llधीर नका सोडू प्रसंग जरी आला बाका,कोरोनात नाही दम इतका, जो तुम्हा लावील धक्का ll रामदास आठवले लवकर बरे व्हा." असे ट्विट अनिल देशमुख यांनी केले होते.