डी. वाय पाटील विद्यापीठाकडून रामदास आठवलेंना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 07:26 PM2020-02-13T19:26:08+5:302020-02-13T19:41:14+5:30
या सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात रिपाइंचे कार्यकर्ते उपस्थित होते.
मुंबई - रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना त्यांनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या अतुलनीय समाजसेवेमुळे आणि देशसेवेमुळे डी वाय पाटील विद्यापिठातर्फे डी. लिट. या पदवीने गौरव करण्यात आला. नेरुळ येथील डी वाय पाटील स्टेडियममध्ये हा कार्यक्रम झाला.
या भव्य सोहळ्यात रामदास आठवले यांना डॉ. डी वाय पाटील यांच्या हस्ते डॉक्टर ऑफ लिटरेचर (डि.लीट) या पदवीने गौरविण्यात आले. या सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात रिपाइंचे कार्यकर्ते उपस्थित होते. डी. लिट पदवी प्रदान सोहळ्याचा क्षण आपल्या डोळ्यांत साठविण्यासाठी आठवलेंच्या पत्नी सीमा आठवले, मुलगा जित आठवलेसह संपूर्ण आठवले कुटुंब उपस्थित होते.
रामदास आठवले सध्या राज्यसभेचे खासदार आहेत तसेच केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) पक्षाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. तासगावच्या ढालेवाडीत त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांनी मुंबई गाठली. वडाळ्याच्या सिद्धार्थ विहार वसतिगृहात ते राहायला होते. १९७२ मध्ये दलित पँथरची स्थापना झाली त्यात ते सक्रीय सदस्य होते. पुरोगामी आणि दलित चळवळीतील अनेक मान्यवरांची भाषणे आणि व्याख्याने ऐकून त्यांचा हळू हळू लोकांची संपर्क आला.
दलित पँथरच्या माध्यमातून त्यांनी आपल्या राजकीय जीवनाला सुरुवात केली. अन्यायाविरोधात लढा देणे त्यातून सामान्यांमध्ये त्यांची लोकप्रियता वाढत गेली. मराठवाडा नामांतर चळवळीतही रामदास आठवलेंनी आक्रमकपणे आंदोलन केलं होतं. हे आंदोलन राज्यभरात पेटलं होतं. यावेळी तत्कालीन सरकारविरोधात त्यांनी मोठा लढा दिला होता. त्यानंतर शरद पवारांच्या मंत्रिमंडळात त्यांचा समावेश आहे. मुंबई, पंढरपूर येथील लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून रामदास आठवले निवडून आले होते.