मुंबई : साहित्य क्षेत्रात २०२३ मध्ये उत्कृष्ट साहित्य निर्मिती करणाऱ्या लेखक, कवींना दिल्या जाणाऱ्या लोकमत साहित्य पुरस्कारांची घोषणा मुंबईत झाली. एकूण १० साहित्य प्रकारांत १२ साहित्यिकांना आणि ज्येष्ठ प्रकाशक, लेखक रामदास भटकळ यांना जीवनगौरव पुरस्कार घोषित झाला आहे. पुरस्कार वितरण समारंभ मंगळवार, २७ फेब्रुवारी रोजी ठाणे येथील गडकरी रंगायतन येथे होणार आहे. लाेकमत राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांसाठी पुस्तकांच्या शिफारसी मागविण्याकरिता महाराष्ट्रभरातील २५ तज्ज्ञांच्या समितीने २०२३ मधील उत्तम पुस्तकांची शिफारस केली हाेती.
समीर गायकवाड, (कथा/खुलूस) रोहन प्रकाशन
जी. के. ऐनापुरे, (कादंबरी/ओस निळा एकान्त) शब्द प्रकाशन
संग्राम गायकवाड, (कादंबरी/मनसमझावन) रोहन प्रकाशन
पांडुरंग सुतार, (कविता/ते कोण लोक आहेत?) वर्णमुद्रा प्रकाशन
अंजली जोशी, (चरित्र/गुरू विवेकी भला) मॅजेस्टिक प्रकाशन
जयप्रकाश सावंत, (अनुवाद/भैया एक्स्प्रेस आणि इतर कथा) शब्द प्रकाशन
वीणा गवाणकर, (बालसाहित्य/किमयागार कार्व्हर) राजहंस प्रकाशन
अंजली चिपलकट्टी, (वैशिष्ट्यपूर्ण/माणूस असे का वागतो?) राजहंस प्रकाशन
हिनाकौसर खान, (वैशिष्ट्यपूर्ण/धर्मरेषा ओलांडताना) साधना प्रकाशन
चंद्रमोहन कुलकर्णी, (मुखपृष्ठ मांडणी/नाही मानियले बहुमता) मनोविकास
प्रसाद निक्ते, (पर्यावरण / वॉकिंग ऑन द एज) समकालीन प्रकाशन
केशवचैतन्य कुंटे, (विशेष प्रयोग / भारतीय धर्मसंगीत) पॉप्युलर प्रकाशन
रामदास भटकळ, (जीवनगौरव) पॉप्युलर प्रकाशन
मराठी साहित्याला नवा आयाम देणारे कुसुमाग्रज, जी.ए. कुलकर्णी, कवी ग्रेस, विंदा करंदीकर, भालचंद्र नेमाडे या आणि अशा अनेक दिग्गजांच्या साहित्याला पुस्तकांच्या रुपाने सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहोचवणारे व मराठी प्रकाशन व्यवसायात शतकी कामगिरी करणारे पॉप्युलर प्रकाशनचे ज्येष्ठ प्रकाशक, लेखक रामदास भटकळ यांना जीवनगौरव पुरस्कार घोषित झाला आहे. पॉप्युलर प्रकाशन संस्थेला यंदा १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने रामदास भटकळ यांच्या साहित्य क्षेत्रातील १०० वर्षांचा पट देखील मांडला जाणार आहे.