मुंबई : जेट एअरवेजने औरंगाबाद येथे निघालेले रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांना विमानप्रवेश नाकारल्याची घटना मंगळवारी घडली. याची माहिती समजताच आठवले समर्थकांनी जेट एअरवेजच्या कार्यालयावर मोर्चा नेऊन जोरदार आंदोलन केले. त्यानंतर जेट एअरवेजने आठवले यांची माफी मागितली.मानवी हक्क अभियानाचे अध्यक्ष अॅड. एकनाथ आव्हाड यांचे सोमवारी निधन झाले. मराठवाड्यातील माजलगाव भागातून निघणाऱ्या अंत्ययात्रेत सहभागी होण्यासाठी आठवले हे मंगळवारी पहाटे सव्वापाच वाजता जेट एअरवेजच्या विमानाने औरंगाबादला जाणार होते. आठवले २५ मिनिटे आधी मुंबई विमानतळावर पोहंचून त्यांनी बोर्डिंग पासदेखील काढला होता. पण उशीर झाल्याचे कारण सांगत जेटने त्यांना विमानप्रवेश नाकारला. त्यामुळे आठवले यांना पुन्हा घरी परतावे लागले. हा प्रकार रिपाइं कार्यकर्त्यांनी जेट एअरवेजच्या कार्यालयाबाहेर तीव्र आंदोलन केले. त्यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. अखेर जेट एअरवेजचे उपाध्यक्ष संतोष चाळके यांनी झाल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त केली. यापूर्वीही जेट एअरवेजने दोन वेळा असा प्रकार केला असल्याची माहिती रिपाइंचे जनसंपर्क अधिकारी हेमंत रणपिसे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. जेट एअरवेजच्या अधिकाऱ्यांनी आठवले यांच्या घरी जाऊन भेट घेतली आणि खुलासा देत लेखी माफीनामा दिल्याची माहितीही रणपिसे यांनी दिली. (प्रतिनिधी)
रामदास आठवलेंना विमानप्रवेश नाकारला
By admin | Published: May 27, 2015 1:43 AM