शिवसेना पक्षप्रमुख कोण, ठाकरे की अनिल परब? रामदास कदम यांचा सवाल; उदय सामंतांवरही हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2021 05:08 AM2021-12-19T05:08:14+5:302021-12-19T05:09:06+5:30

शिवसेना नेते रामदास कदम यांनी परिवहन मंत्री अनिल परब व उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्यावर निशाणा साधला.

ramdas kadam asked who is shiv sena chief and criticised anil parab and uday samant too | शिवसेना पक्षप्रमुख कोण, ठाकरे की अनिल परब? रामदास कदम यांचा सवाल; उदय सामंतांवरही हल्लाबोल

शिवसेना पक्षप्रमुख कोण, ठाकरे की अनिल परब? रामदास कदम यांचा सवाल; उदय सामंतांवरही हल्लाबोल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : शिवसेनेतील पक्षांतर्गत खदखदत असलेली धुसफूस अखेर शनिवारी चव्हाट्यावर आली. शिवसेना नेते रामदास कदम यांनी परिवहन मंत्री अनिल परब व उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्यावर निशाणा साधला. परिणामी, भाजप नेते किरीट सोमय्या यांचे आरोप, ईडीचे शुक्लकाष्ठ तसेच एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्यातील अपयश यामुळे अडचणीत असलेल्या परब यांना स्वकियांच्याही तोफेला तोंड द्यावे लागत आहे. 

कदम यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच जाब विचारल्यामुळे ते पक्षात राहणार की जाणार, अशी चर्चाही सुरू झाली आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांच्या विरोधात बोललो की पक्षाच्या विरोधात बोललो अशी परिस्थिती आहे. शिवसेना पक्षप्रमुख नेमके कोण आहेत? उद्धव ठाकरे की अनिल परब? असा सवाल रामदास कदम यांनी मुंबईत शनिवारी पत्रकारांशी बोलताना केला. परब कोकणात शिवसेनेचे अस्तित्त्व संपवण्याचे काम करत असून तेच खरे गद्दार आहेत. ते शिवसेनेला गहाण ठेवण्याचे काम करत आहेत. सुनील तटकरे, जयंत पाटलांना खुलेआम मदत करत आहेत. मला आणि मुलाला तिकीट मिळू नये म्हणून ते प्रयत्न करत होते. त्यांच्या अरेरावीपणाचा माझ्या मुलाला त्रास होत आहे. याचे मला दु:ख आहे, असे ते म्हणाले. उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याबाबत बोलताना आम्ही आता सामंत यांच्याकडून पक्षनिष्ठा शिकायची का, असा चिमटा त्यांनी काढला.

सोमय्यांशी बोललो नाही

मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो की, किरीट सोमय्या यांच्याशी चर्चा केली नाही. परब यांचे हॉटेल ही शिवसेनेची मालमत्ता नाही. मिलिंद नार्वेकरांनी अनधिकृत बांधकाम स्वत: तोडले. मग परबांच्या अनधिकृत मालमत्तेविरोधात बोललो तर काय चुकले, असा सवाल कदम यांनी केला.

थेट मुख्यमंत्र्यांवरही केली टीका

मंत्रिपदाबाबत मी स्वत: उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो. मी, दिवाकर रावते आणि सुभाष देसाई ज्येष्ठ झालो आहोत. त्यामुळे नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी, असे मी सांगितले. मला मंत्रिपद मिळाले नाही याचं दु:ख नाही, पण यादीत पहिले नाव देसाईंचे होते. नव्या चेहऱ्यांना संधी का मिळाली नाही, या शब्दांत त्यांनी ठाकरेंवरही तोफ डागली.

ठाकरेंना भेटून पुढील निर्णय

भाजपमध्ये जाणार का या प्रश्नावर रामदास कदम म्हणाले की, मी शिवसेनेतून बाहेर पडणार नाही. हकालपट्टी केली तरी शिवसैनिक म्हणून जगेन. भगव्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढेन. परंतु मुलांच्या आणि समर्थकांच्या भवितव्यासाठी मला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. उद्धव यांना भेटल्यानंतर मी योग्य तो निर्णय घेईन.

मला रामदास कदमांच्या आरोपांवर काहीही बोलायचे नाही. ते शिवसेनेचे नेते आहेत आणि पक्ष त्यावर बोलेल. मी काहीही बोलू इच्छित नाही. - अनिल परब, परिवहन मंत्री

नारायण राणे यांनी शिवसेना सोडली, तेव्हा कदमही सोडणार होते. बाळासाहेबांनी विरोधी पक्षनेते पद दिल्यामुळे ते थांबले. शिवसेनेत सर्वांत मोठे गद्दार कदमच आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनीच मला पाडले. - सूर्यकांत दळवी, माजी आमदार

महाविकास आघाडीमुळे शिवसेनेचे शंभर टक्के नुकसान होत आहे. आमचा फक्त वापर करणे सुरू आहे. मी ही बाब मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातली आहे. - हेमंत पाटील, खासदार, हिंगोली
 

Web Title: ramdas kadam asked who is shiv sena chief and criticised anil parab and uday samant too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.