मुंबई-
गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेत नाराज असलेले रामदास कदम यांनी अखेर आज पत्रकार परिषद घेत मनातील खदखद व्यक्त केली आहे. अनिल परब यांच्या विरोधात बोललं की पक्षाच्या विरोधात बोललं अशी परिस्थिती आता झाली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख नेमकं कोण आहेत? उद्धव ठाकरे की अनिल परब?, असा सवाल उपस्थित करत रामदास कदम यांनी अनिल परब यांच्यावर जोरदार टीका केली. अनिल परब कोकणात शिवसेनेचं अस्तित्त्व संपवण्याचं काम करत असून ते खरे गद्दार आहेत, असा आरोप रामदास कदम यांनी केला आहे.
"अनिल परब हे शिवसेनेला गहाण ठेवण्याचं काम करत आहेत. मला आणि मुलाला तिकीट मिळू नये म्हणून परब सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. मला कोणतंही मंत्रिपद नकोय. मी तर दोन वर्षांपूर्वीच राजकाराणातून निवृत्तीची घोषणा केलीय. मग माझ्या नाराजीचा विषय येतोच कुठून? पण अनिल परब यांच्या अरेरावीपणाचा माझ्या मतदार संघात माझ्या मुलाला त्रास होतो आहे. याचं दु:ख मला आहे", असं रामदास कदम म्हणाले.
अनिल परबांवर जोरदार हल्लाबोलरामदास कदम यांनी यावेळी अनिल परब यांच्यावर चहुबाजूंनी टीका करत त्यांच्यावर जोरदार आरोप केले. अनिल परब हे दापोलीत मनसे कार्यकर्त्यांसाठी महात्मा गांधी बनले आहेत. मला गद्दार ठरवण्यासाठी अनिल परबांकडून प्रयत्न केले जात आहेत. ज्यावेळी शिवाजी पार्कात माझ्याविरोधात घोषणाबाजी झाली त्याचं मला खूप वाईट वाटलं. त्यामागे कोण होतं हे कळालं पाहिजे, असंही रामदास कदम म्हणाले.
नव्या चेहऱ्यांना संधी का दिली नाही?"मंत्रिपदांबाबत मी स्वत: उद्धव ठाकरे यांच्याशी शिवसेना भवनात बोललो होतो. मी, दिवाकर रावते आणि सुभाष देसाई आता ज्येष्ठ झालो आहोत. त्यामुळे आम्हाला मंत्रिपदं न देता नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी असं मी स्वत: उद्धवजींना सांगितलं होतं. मला मंत्रिपद मिळालं नाही याचं अजिबात दु:ख नाही. पण यादीत पहिलं नाव सुभाष देसाईंचं होतं. नव्या चेहऱ्यांना संधी का मिळाली नाही असा प्रश्न मला पडला", असं रामदास कदम म्हणाले.
शिवरायांची शपथ घेऊन सांगतो की...रामदास कदम आणि किरीट सोमय्या यांच्यात चर्चा झाली असून अनिल परबांविरोधात कटकारस्थान रचलं जात असल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असल्याच्या मुद्द्यावर देखील कदम यांनी स्पष्टीकरण दिलं. "मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो की माझं कधीच किरीट सोमय्या यांच्याशी चर्चा झालेली नाही. अनिल परब यांचं हॉटेल ही काही शिवसेनेची मालमत्ता नाही. मिलिंद नार्वेकरांनी अनधिकृत बांधकाम स्वत: तोडलं. मग अनिल परबांची अनधिकृत मालमत्ता काय शिवसेनेची मालमत्ता आहे का? त्याविरोधात बोललं तर काय चुकीचं केलं? ", असं रामदास कदम म्हणाले.