मुंबई- हकालपट्टीसाठी आता वेगळी समितीच नेमावी, असा टोला राज्याचे माजी मंत्री रामदास कदम यांनी लगावून शिवसेना नेतृत्वाची खिल्ली उडवली आहे, तसेच बाळासाहेबांच्या पाठीत कुणी खंजीर खुपसला हे लवकरच उघड करणार, असा गर्भित इशाराही त्यांनी दिला.
महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर शिवसेनेत प्रामुख्याने दोन गट पडले आहेत. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक गट आणि दुसरा उद्धव ठाकरे यांचा. मुख्यमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्रातील आमदार, खासदार तसेच शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांना पाठिंबा दर्शविलेला आहे. मात्र, शिंदे यांना पाठिंबा दर्शविणाऱ्या पदाधिकाऱ्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.
शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांचीही हकालपट्टी केल्याने कदम यांनी भावनिक होऊन शिवसेनेसाठी एवढी वर्षे काम केल्यानंतर झालेली हकालपट्टी चुकीची असल्याचे माध्यमांसमोर सांगितले. मात्र, या हकालपट्टीनंतर शिंदे यांनी पुन्हा कदम यांना शिवसेना नेतेपदाची धुरा सोपविली आहे.
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शुभेच्छा देण्यासाठी आल्याचे कदम यांनी यावेळी सांगितले. आता अनेक कार्यकर्ते शिंदे गटाकडे येण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे हकालपट्टीसाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वेगळी समिती नेमावी, असा खाेचक सल्ला कदम यांनी दिला, तर उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करावे, असेही ते म्हणाले.