'लढाईला चाललेत, अशाप्रकारे हात वर दाखवून गेले'; रामदास कदम यांचा संजय राऊतांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 07:10 PM2022-08-01T19:10:40+5:302022-08-01T19:15:02+5:30
रामदास कदम यांनी शिवेसेनेचे नेते संजय राऊत यांना ईडीच्या कारवाईनंतर टोला लगावला आहे.
मुंबई- मुंबईतील १ हजार ०३४ कोटींच्या पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घराची झाडाझडती घेतल्यानंतर सुरुवातीला ताब्यात घेऊन रविवारी रात्री उशीरा ईडीने अटक केली. त्यानंतर ईडीने संजय राऊत यांची न्यायालयाकडे ८ दिवसांच्या कोठडीची मागणी केली. मात्र संजय राऊत यांच्या वकिलांनी कोठडी द्यायची असेल तर आठ दिवसांपेक्षा कमी द्यावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर न्यायालयाने संजय राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.
मोठ्या लढाईला चालले आहेत, अशी पद्धतीने संजय राऊत हात दाखवून गेले, असा टोला शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे. तसेच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी महाराष्ट्रात शिवसेना हा पक्ष संपला आहे, असं विधान केलं होतं. यावर जे.पी. नड्डांच्या या विधानावर मी सहमत नाही, अशी नाराजी रामदास कदम यांनी व्यक्त केली आहे.
ईडीच्या कारवाईनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना देखील टोला लगावला आहे. 'कर नाही, तर डर कशाला, चौकशी होऊन जाऊ द्या', असं एकनाथ शिंदे यांनी संजय राऊतांच्या कारवाईवर भाष्य केलं आहे. तसेच तो ८ वाजताचा भोंगा बंद झालाय, आता येणारच नाही, असा टोला देखील एकनाथ शिंदे यांनी संजय राऊतांना लगावला. सध्या एकनाथ शिंदे मराठवाडाच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
न्यायालयाने संजय राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. संजय राऊतांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांच्याकडून संजय राऊत यांना दरमहा २ लाख रुपये दिले जायचे असा आरोप ईडीने केला आहे. तसेच संजय राऊत यांच्या परदेश दौऱ्यासाठीही प्रविण राऊत यांनी पैसा दिला होता असाही दावा ईडीने केला. २०१०-११च्या दरम्यान संजय राऊतांनी अनेक परदेश दौऱ्यांना फायनान्स करण्यात आले होते, असा आरोपही ईडीने केला.
दरम्यान, संजय राऊतांच्या अटकेनंतर त्यांचे भाऊ आमदार सुनिल राऊत यांनी पत्रा चाळ आणि संजय राऊतांचा काडीमात्र संबंध नसल्याचे सांगितले. अटक करण्यासाठी काहीतरी पाहिजे म्हणून पत्रा चाळ प्रकरण पुढे केलं आहे. हा शिवसेनेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. संजय राऊत यांना अटक करण्यासाठी फ्रेम तयार केली. त्यात बोगस कागदपत्रे लावले आहेत. ईडी त्यांचं काम करेल आम्ही आमचं काम करु, असं सुनील राऊत म्हणाले.