Ramdas Kadam: पवारांनीच शिवसेना फोडली म्हणणाऱ्या रामदास कदमांना राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 03:03 PM2022-07-19T15:03:19+5:302022-07-19T15:04:53+5:30
Ramdas Kadam: शरद पवार यांनी २०१९ मध्ये राष्ट्रवादी-शिवसेना-काँग्रेस या तीन पक्षांची मोट बांधली आणि उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री केले.
मुंबई - बंडखोर आमदारांनी शिवसेना फोडली... मातोश्रीला दगाफटका केला... ठाकरे कुटुंबाचा विश्वासघात केला आणि स्वतःच्या कृतीला योग्य आहे हे दाखविण्यासाठी त्याचे खापर राष्ट्रवादीच्या माथ्यावर मारण्याचा केविलवाणा प्रयत्न रामदास कदम व काही बंडखोर नेत्यांचा असल्याचे प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी दिले. दरम्यान, शिवसेनेच्या रामदास कदम यांनी शिवसेना फुटीला केवळ राष्ट्रवादी आणि शरद पवार हेच जबाबदार असल्याचं म्हटलं होतं.
शरद पवार यांनी २०१९ मध्ये राष्ट्रवादी-शिवसेना-काँग्रेस या तीन पक्षांची मोट बांधली आणि उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री केले. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून चांगला कारभार केल्यामुळेच देशाच्या पाच टॉप मुख्यमंत्र्यांच्या यादीत त्यांचे नाव आले आहे. त्यामुळे उध्दव ठाकरे यांना सोडून जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस उध्दव ठाकरे यांच्याच मागे खंबीरपणे उभी आहे. शिंदे गटाने शिवसेना फोडली याचे खरे सूत्रधार भाजप असून २०१९ मधील जो राग आहे त्यातून हे षडयंत्र सुरू आहे, असा आरोप महेश तपासे यांनी केला.
पोलीस बळ आणि केंद्रीय यंत्रणांचा वापर करत आमदार खासदार यांना भयभीत केले गेले आहे आणि यामध्ये उध्दव ठाकरे कसे चुकले हे दाखवण्याचा प्रयत्न आहे. मात्र राज्यातील जनता व शिवसैनिक ज्यांना निवडून दिले त्यांनी मातोश्रीशी कशी गद्दारी केली हे पहाते आहे. आज शिवसेना फोडून शिंदे आपली शिवसेना खरी आहे हे सांगत आहेत मग इतकी वर्षे मातोश्रीचं... स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची मेहनत... उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची शिवसेना वाढीची मेहनत काहीच नाही का? असा सवालही तपासे यांनी केला आहे.
शिवसेना बंडखोर आमदारांनी जी कृती केली आहे ती कृती महाराष्ट्रातील जनतेच्या पचनी पडलेली नाही. उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी निष्ठावान सामान्य शिवसैनिक असल्याने त्यांच्यावर डायरेक्ट टिका न करता राष्ट्रवादीवर तोंडसुख घेण्याचे काम बंडखोर शिंदे गट करत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत, लोकसभा, विधानसभा यामध्ये महाविकास आघाडी एकत्रित प्रचार करेल व बंडखोरांना व रिमोट कंट्रोल चालवणार्या भाजपचा पराभव होईल ही भीतीही निर्माण झाल्याचेही तपासे यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले रामदास कदम
"52 वर्षे मी कामं केलं पण माझ्यावर नेतेपदाचा राजीनामा देण्याची वेळ येईल असं कधी स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. आयुष्याची संध्याकाळ अंधारमय होईल असं कधीच वाटलं नव्हतं" हे सांगताना रामदास कदम अत्यंत भावूक झालेले पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी शरद पवारांवर देखील जोरदार निशाणा साधला आहे. "शरद पवारांनी डाव साधला, पक्ष फोडला" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. "मी खूप अस्वस्थ आहे. मी राजीनामा दिल्याने मी समाधानी नाही, आनंदी नाही. 52 वर्षे लढणारा नेता राजीनामा का देतो? याचा विचार करायला हवा. दु:ख होतं वेदना होतात. मी प्रामाणिकपणे हात जोडून आपण राष्ट्रवादीसोबत बसू नका असं सांगितलं होतं"