प्लास्टिकविरोधात थंडावलेली कारवाई पुन्हा सुरू होणार- रामदास कदम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2019 02:51 AM2019-07-02T02:51:46+5:302019-07-02T02:52:00+5:30
बंदीमुळे राज्यातील प्लास्टिक उत्पादन करणारे कारखाने बंद झाले.
मुंबई : निवडणुकीच्या काळात प्लास्टिक विरोधात थंडावलेली कारवाई पुन्हा सुरू झाली असून येत्या आठ दिवसांत त्याचे परिणाम दिसतील, अशी माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज विधानसभेत दिली. बंदीमध्ये काही सूट देण्याचा कुठलाही प्रश्न उद्भवत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रश्नोत्तराच्या तासात प्लास्टिक बंदीबाबत विधानसभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना कदम यांनी सांगितले की, सरकारने बंदीचा निर्णय घेतल्यानंतर सुरुवातीला काही दिवस कारवाईच्या भीतीने प्लास्टिकचा वापर बंद झाला होता. मात्र आता पुन्हा प्लास्टिकपिशव्यांचा वापर सुरू झाला आहे. तेव्हा सरकार काय भूमिका घेणार असा सवाल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला होता. आचारसंहितेमुळे कारवाईचे काम थाबंले होते. आता पुन्हा ही कारवाई सुरू झाली आहे. येत्या आठ दिवसांत या कारवाईचे परिणाम दिसू लागतील, अशी माहिती कदम यांनी दिली.
बंदीमुळे राज्यातील प्लास्टिक उत्पादन करणारे कारखाने बंद झाले. बेरोजगार झालेल्यांना सरकार नुकसान भरपाई देणार का, असा प्रश्न भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा, राज पुरोहित यांनी केला. तर, आशिया खंड जेवढा आहे, तेवढा प्लास्टिकचा कचरा समुद्रात साठलेला आहे. त्यामुळे प्लास्टिकचे छोट्यामोठ्या व्यापाऱ्यांनी इतर व्यवसायाकडे वळावे, यापुढे प्लास्टिक कारखाने सुरू होऊ देणार नाही, असे कदम यांनी स्पष्ट केले.
गुजरातमध्येही बंदी करा
आपल्या राज्यात ८० टक्के प्लास्टिक गुजरातमधून येत होते, त्यामुळे तिथले लोक बेरोजगार झाले आहेत. गुजरातमध्येही प्लास्टिकबंदी लागू करावी यासाठी मी पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे, अशी माहितीही रामदास कदम यांनी दिली.