मुंबई- शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचे पुत्रे सिद्धेश कदम यांची महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आबासाहेब जऱ्हाड हे होते, गेल्या काही दिवसापासून ते गैरहजर असल्याचे कारण देत त्यांनी अध्यक्षपदावरुन हटवण्यात आले आहे.
शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचा एक मुलगा विद्यमान आमदार आहेत.तर सिद्धेश कदम हे या आधी युवा सेनेच्या कार्यकारिणीचे सदस्य होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली यावेळी रामदास कदम यांनी एकनाथ शिंदे यांची साथ दिली. यामुळे आता त्यांचे पुत्र सिद्धेश कदम यांच्यावर मोठी जबाबदारी दिल्याचे बोलले जात आहे.
'पुन्हा अशी दमदाटी केली तर मला शरद पवार म्हणतात'; पवारांनी अजितदादांच्या आमदाराला भरला दम
रामदास कदम यांनी सकाळीच भाजपवर केली होती टीका
महाराष्ट्रात आम्ही शिवसेना-राष्ट्रवादी असो. मोदी-शाह यांच्या कामावर विश्वास ठेऊन सोबत आलोय. आमचा विश्वासघात होणार नाही याची दक्षता भाजपाने घेणे आवश्यक आहे. मोदी-शाह यांनी महाराष्ट्रातील काही नेत्यांचे कान पकडले पाहिजेत अशा शब्दात शिवसेना नेते रामदास कदम यांनी राज्यातील भाजपा नेत्यांना फटकारलं आहे.
रामदास कदम म्हणाले की, ज्या आमच्या विद्यमान जागा आहेत तिथे काही भाजपाच्या मंडळी आम्हीच उमेदवार आहोत असं सांगतायेत. तालुक्यात, मतदारसंघनिहाय जातात तिथे हे सुरू आहे ही माझी खंत आहे. रत्नागिरी, रायगड, मावळ, संभाजीनगर याठिकाणी हे सुरू आहे. हे जे चाललंय ते महाराष्ट्र भाजपाच्या माध्यमातून घृणास्पद सुरू आहे. मोदी-शाह यांनी महाराष्ट्रातील काही नेत्यांचे कान पकडले पाहिजेत. प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवायचा आहे. परंतु तुमच्यावर विश्वास ठेवून जी लोक आलेत त्यांचा केसाने गळा कापू नका. भविष्यात तुम्ही यातून वेगळा संदेश महाराष्ट्राला देताय याचे भान भाजपाच्या लोकांना असणे गरजेचे आहे असंही कदमांनी म्हटलं होतं. दुसरीकडे आज दुपारी रामदास कदम यांचे पुत्रे सिद्धेश कदम यांची महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.