Join us

कोळी समाजाचे प्रलंबित प्रश्न सोडवणार- रमेशदादा पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 9:00 PM

कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेशदादा पाटील यांची काल नागपूर पावसाळी अधिवेशनात भाजपाचे आमदार म्हणून विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली होती.

- मनोहर कुंभेजकर मुंबई- कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेशदादा पाटील यांची काल नागपूर पावसाळी अधिवेशनात भाजपाचे आमदार म्हणून विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली होती. आज सकाळी 11 वाजता अंधेरी ( पूर्व )सहार येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर नागपूरवरून जेट विमानाने त्यांचे आगमन झाले. आमदार म्हणून काल निवड झाल्यावर प्रथमच मुंबई विमानतळावर उतरल्यावर मुंबईतील कोळी व तत्सम समाजातील सुमारे 600 बांधवांनी भरपावसात त्यांचे जंगी स्वागत केले.यावेळी कोळी महासंघाचे कार्याध्यक्ष प्रकाश बोबडी, युवा अध्यक्ष अँड.चेतन पाटील, उपाध्यक्ष रामकृष्ण केणी, उपाध्यक्ष व माजी नगरसेवक विलास चावरी, प्रवीण भावे आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. अनेक वर्षानंतर कोळी समाजला राजकीय प्रतिनिधित्व मिळल्यामुळे मुंबईसह राज्यातील तमाम कोळी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.भाजपातर्फे विधान परिषदेवर आमदार म्हणून प्रतिनिधित्व मिळणारे ते पहिलेच आमदार आहेत. त्यामुळे आता कोळी समाजाचे प्रश्न निश्चितच सुटतील, असा विश्वास टपके यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.2014 मध्ये शिवसेना व भाजपाची युती तुटल्यावर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याबरोबर रमेशदादा पाटील यांनी राज्यभर दौरा करून 45 आमदार निवडून आणलेत, तसेच पालघर येथे भाजपाचे खासदार राजेंद्र गावित व नुकत्याच ठाणे पदवीधर मतदारसंघात विधान परिषदेवर निवडून आलेले भाजपा आमदार निरंजन डावखरे यांच्या विजयात त्यांनी मोलाची कामगिरी केली, अशी माहिती टपके यांनी दिली. कोळी समाजाने रमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकसंघ होऊन चळवळ ऊभारली, याची दखल घेऊन भाजपाने कोळी समाजाला राजकीय प्रतिनिधित्व देण्याचे मान्य केले होते. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आमदारकी देऊन शब्द पाळला आहे, असे कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके यांनी सांगितले.यावेळी आमदार रमेशदादा पाटील म्हणाले की, भाजपाने मला आमदार म्हणून विधान परिषदेवर दिलेले प्रतिनिधित्व हे माझे नसून हे महाराष्ट्रभरातील तमाम कोळी समाजाचे यश आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला आमदार म्हणून संधी दिल्याबद्दल त्यांनी ऋतज्ञता व्यक्त केली. कोळी समाजाचा घरे, गावठाण व सीमांकन, जातीचे दाखले, नोकऱ्यांमध्ये कायमस्वरूपी संरक्षण व रोजगार, कोळी बांधवांचे व कोळी महिलांचे आर्थिक सक्षमीकरण आणि त्यांना उद्योगधंद्यात मदत करणे आदी अनेक प्रलंबित प्रश्न सोडविण्याबरोबरच समाजाला शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या कोळी बांधवांना सक्षम बनविण्याचे भावना त्यांनी विमानतळावर समाज बांधवांकडे व्यक्त केली. आज सकाळी विमानतळावर उतरल्यावर मुंबईतील सर्व कोळीवाड्यामधून प्रमुख प्रतिनिधींनी मोठी गर्दी केली होती, त्या वेळी ते बोलत होते. कोळी समाजाने रमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकसंघ होऊन चळवळ उभारली, याची दखल घेऊन भाजपाने कोळी समाजाला राजकीय प्रतिनिधित्व देण्याचे मान्य केले होते, त्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आमदारकी देऊन आपला शब्द पाळला आहे, असे कोळी राजहंस टपके यांनी शेवटी सांगितले.