Ramesh Dev : राज ठाकरेंनी घेतले अंत्यदर्शन, रमेश देव यांना वाहिली श्रद्धांजली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 01:00 PM2022-02-03T13:00:47+5:302022-02-03T13:01:48+5:30
देव यांच्या पार्थिवावर आज विलेपार्ले येथे अंत्यसंस्कार होत असून अनेक कला आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गजांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. मनसेचे प्रमुख आणि कलाप्रिय नेते राज ठाकरे यांनीही देव यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले
मुंबई - उत्फुल्लतेचा झरा असलेले, सर्व प्रकारच्या भूमिका लीलया साकारणारे, मनोरंजनाच्या सर्व माध्यमांतून रसिकमान्यता लाभलेले सदाबहार अभिनेते रमेश देव यांचे बुधवारी रात्री ८.३०च्या सुमारास कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी मराठीमनांवर राज्य केलं. त्यांच्या निधनानंतर सर्वच स्तरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.
देव यांच्या पार्थिवावर आज विलेपार्ले येथे अंत्यसंस्कार होत असून अनेक कला आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गजांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. मनसेचे प्रमुख आणि कलाप्रिय नेते राज ठाकरे यांनीही देव यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. राज यांच्यासह राज्यातील प्रमुख नेत्यांनीही देव यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सोशल मीडियातून रमेश देव यांच्या आठवणी जागवत त्यांना श्रद्धांजली वाहिली.
मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली
मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या सदाबहार अभिनयाची छाप उमटवणारा, मनस्वी असा अभिनेता आपण आज गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांना श्रद्धांजली वाहिली आहे. शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचा परवाच वाढदिवस होता. शुभेच्छांचा ओघ सुरू असतानाच त्यांचे आपल्यातून जाणे दुःखदायक आहे. रमेश देव यांनी मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली. दोन्हीकडे आपल्या अभिनयाची छाप उमटवली. त्यांचे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्नेहबंध होते. त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणातही संधी आजमावली होती.
नाट्य क्षेत्राने वाहिली श्रद्धांजली
नाटक अथवा मराठी व हिंदी चित्रपट असोत, भूमिका कुठलीही असो, ती चोख बजावून प्रत्येक भूमिकेला न्याय देण्यात त्यांचा हातखंडा होता. प्रसन्न चेहरा, साधी राहणी आणि मनमिळाऊ स्वभावामुळे ते सर्वांनाच आपलेसे वाटायचे. त्यांच्या साधेपणात उच्च दर्जाचा अभिनेता दडला होता. त्यांच्या जाण्याने नाटक आणि चित्रपटसृष्टीने गुणी अभिनेता गमावला आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांना नाट्य व चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली.
गुणी कलाकार हरपला
रमेश देव यांच्यासमवेत एका नाटकात आणि ‘साता जन्माची सोबती’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. कायम हसतमुख चेहरा, सर्वांना सहकार्य करण्याची वृत्ती, जो भेटेल त्यांची आपुलकीने चौकशी करणे, चुकूनही कोणाची निंदा न करणे हा त्यांचा स्वभाव होता. त्यांच्या हस्ते मला जेजुरीभूषण पुरस्कारही मिळाला होता. एक गुणी कलाकार काळाच्या पडद्याआड गेला. याचे अत्यंत वाईट वाटत आहे. - लीला गांधी, ज्येष्ठ अभिनेत्री
चित्रपटातील भूमिकांचे प्रेक्षकांच्या मनावर होते गारुड
रमेश देव यांनी चित्रपटसृष्टीत दीर्घकाळ काम केले. रमेश आणि सीमा देव कायम उत्साही असायचे. भूमिका कोणतीही असो; रमेश देव त्याबाबत सकारात्मक असायचे. ते यशस्वी जीवन जगले. त्यांच्या मराठी चित्रपटातील भूमिकांचे प्रेक्षकांच्या मनावर गारुड होते. ते त्यांच्या चित्रपटातील भूमिकांच्या माध्यमातून कायम आपल्यात राहतील. - डॉ. मोहन आगाशे, ज्येष्ठ अभिनेते.
रंगभूमीवरील प्रसन्न चेहरा हरपला
सोलापूरला मित्र पृथ्वीराज बायस यांचे मामा म्हणून अभिनेते रमेश देव यांना पहिल्यांदा पाहिले. गदिमा, सुधीर फडके, राजा परांजपे यांनी मराठी चित्रपटांचा नवीन काळ आणला. त्याचा चेहरा रमेश देव होते. मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ आठवायचा असेल तर नायक आणि खलनायक म्हणून त्यांचा प्रसन्न चेहरा आठवावाच लागेल. रमेश देव यांच्या बोलण्यातला गोडवा आणि उमदे व्यक्तिमत्त्व कायम लक्षात राहील. वडिलकीचा आधार गेला आहे. - डॉ. जब्बार पटेल, ज्येष्ठ दिग्दर्शक.