Join us  

कोळी समाजाचे प्रलंबित प्रश्न सोडवणार, आ. रमेश पाटील यांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2018 10:45 AM

कोळी समाजाने आमदार रमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकसंघ होऊन चळवळ उभारली

मनोहर कुंभेजकर

मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेचे भाजपाचे निर्वाचित आमदार व कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश पाटील यांचा शपथविधी सोहळा विधानभवनात मोठ्या उत्साहात नुकताच संपन्न झाला. यावेळी कोळी महासंघाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, समाजबांधव व इतर अनेक हितचिंतकांनी विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहाबरोबरच विधानभवनाबाहेर मोठी गर्दी केली होती. शपथ ग्रहण करून बाहेर येताच त्यांचे ढोलताशांच्या गजरात कोळी मच्छीमार संस्कृतीनुसार कोळी नृत्य करून त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. 

पाटील यांनी यावेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना कोळी महासंघाचे सर्व पदाधिकारी व समाजबांधवांचे आभार मानले. तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस व मुंबई भाजपाचे आमदार अँड. आशिष शेलार यांचे विशेष आभार मानले. कोळी समाजाला मिळालेले हे राजकीय प्रतिनिधित्व भाजपाच्या सबका साथ सबका सबका विकास या वचनाची परिपूर्ती असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

भाजपाने मला आमदार म्हणून विधान परिषदेवर दिलेले प्रतिनिधित्व हे माझे नसून हे महाराष्ट्रभरातील तमाम कोळी समाजाचे यश असल्याचे आ. रमेश पाटील यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला आमदार म्हणून संधी दिल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. कोळी समाजाची घरे, गावठाण व सीमांकन, जातीचे दाखले, नोकऱ्यांमध्ये कायमस्वरूपी संरक्षण व रोजगार, कोळी बांधवांचे व कोळी महिलांचे आर्थिक सक्षमीकरण आणि त्यांना उद्योगधंद्यात मदत करणे आदी अनेक प्रलंबित प्रश्न सोडविण्याबरोबरच समाजाला शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या कोळी बांधवांना सक्षम बनविण्याची भावना लोकमतशी बोलताना पाटील यांनी व्यक्त केली.

कोळी समाजाने आमदार रमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकसंघ होऊन चळवळ उभारली. याची दखल घेऊन भाजपाने कोळी समाजाला राजकीय प्रतिनिधित्व देण्याचे मान्य केले होते. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आमदारकी देऊन आपला शब्द पाळला आहे, असे राजहंस टपके यांनी सांगितले. 2014 मध्ये शिवसेना व भाजपाची युती तुटल्यावर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याबरोबर आमदार रमेश पाटील यांनी राज्यभर दौरा करून 45 आमदार निवडून आणले होते. तसेच पालघर येथे भाजपाचे खासदार राजेंद्र गावित व नुकत्याच ठाणे पदवीधर मतदारसंघात विधान परिषदेवर निवडून आलेले भाजपा आमदार निरंजन डावखरे यांच्या विजयात त्यांनी मोलाची कामगिरी केली, अशी माहिती टपके यांनी दिली. 

टॅग्स :मुंबईमच्छीमार