मुंबई : देशासमोर महागाई, बेरोजगारी, टंचाई यासारखे प्रश्न आहेत. त्याकडे लक्ष द्या. हनुमानाचा जन्म अंजनेरीला झाला की किश्कंदला झाला, हा वाद अनावश्यक आहे. याला फार महत्त्व देऊ नका, अशा शब्दांत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी संबंधितांना सुनावले.राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयातील जनता दरबारनंतर माध्यमांशी बोलताना गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला.
हनुमानाचा जन्म हा वाद अनावश्यक आहे. त्यापेक्षा महागाई, बेरोजगारीकडे लक्ष द्या, असे सांगतानाच हे सगळे ठरवून चालले आहे. जे विषय देशासमोर नाहीत, ते विषय काढून वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न होत आहे. राम जन्म व हनुमान जन्म कुठे झाला हा विषय आजचा नाही, असे ते म्हणाले. केंद्राच्या नोटाबंदीच्या धोरणामध्ये मोठी चूक असून, धोरण कुठे फसले याबाबतची भूमिका सरकारने स्पष्ट करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
धमकीबाबत चौकशी करण्याचे आदेश
महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना आलेल्या धमकीची माहिती गृहविभागाकडे आली आहे. याची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये जे दोषी आढळतील त्यांना कडक शिक्षा केली जाईल. संबंधितांना पुरेशी सुरक्षा दिलेली आहे. वाटल्यास अजून सुरक्षेत वाढ केली जाईल, असेही ते म्हणाले.