नांदगाव : ५२ व्या वर्षांत पदार्पण करणारा मुरुड तालुक्यातील एकदरा या गावचा श्रीराम जन्मोत्सव पालखी सोहळा भक्तिभाव आणि उत्साहात साजरा झाला. जन्मोत्सव सोहळ्यासाठी विविध गावांतून भक्तगण उपस्थित होते.एकदरा येथील भव्य श्रीराम मंदिरात नाते - महाड येथील प्रसिध्द परशुरामबुवा उपाध्ये यांचे रामचरित्रावर कीर्तन झाले. जन्मोत्सवानंतर भाविकांना प्रसाद देण्यात आला. धनुर्धारी मंडळ व एकदरा ग्रामस्थांच्यावतीने या सोहळ्याचे आयोजन केले होते. १९६४ च्या सुमारास चांगू नागू पाटील, चांगू महादू आगरकर, पांडुरंग गवस, मोतीराम पाटील आणि एकदरा येथील काही उत्साही मंडळी तथा धनुर्धारी मंडळाने या सोहळ्याची परंपरा सुरु केली. गावच्या काही नेते मंडळींचे या कामी मोठे सहकार्य मिळाले होते. ही रामजन्मोत्सवाची उत्साही परंपरा आजही तेवढ्याच एकोप्याने चालत आहे. येथील श्रीराम मंदिर भव्य असून मूर्तीची भव्यता लक्षवेधी आहे. मंदिराच्या सुमारे ४ ते ५ एकराच्या परिसरात नारळाची झाडे, समाज मंदिर लक्ष वेधून घेणारा आहे. एकदरा कोळी बांधवांचा हा सर्वाधिक मोठा उत्सव सोहळा असल्याने मुंबईसह बाहेर मासेमारी व्यवसायासाठी असणारे मच्छीमार पारंपरिक वेषभूषेसह उपस्थित होते. एकरंग - एक ड्रेस - साडी असा महिलांचा पेहराव आणि युवकांचा पेहराव लक्ष वेधून घेत होता. दुपारनंतर एकदऱ्यातून सजविलेल्या दोन ट्रकमधून रामचरित्रावर आधारित भरत भेट व मल्हार मार्तंड खंडेरायाचा चलतचित्र देखाव्यासह श्रीराम पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. मुरुड शहरातील बाजारपेठ नाक्यावर सोहळ्यातील युवकांनी दांडपट्टा, कसरतीचे विविध प्रयोग सादर केले. प्रचंड संख्येने नागरिक सोहळा पाहण्यासाठी उपस्थित होते. भाविकांनी श्रीराम पालखीचे दर्शन घेऊन पूजन केले. शहरात ठिक-ठिकाणी या मिरवणुकीचे उत्साही स्वागत झाले. रायगड जिल्ह्यात एवढी प्रदीर्घ परंपरा असणारा बहुधा एकमेव रामजन्मोत्सव सोहळा असावा. मुरुड शहरातील पुरातन शिव देवस्थान परिसरातही श्रीराम जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.श्रीक्षेत्र बळवलीचा नेत्रदीपक सोहळापेण : श्रीराम जन्मोत्सवाचा अद्भुत सोहळा पेणच्या श्रीक्षेत्र बळवली गावी शनिवारी उत्साहात संपन्न झाला. दिवसी गावात मंगल पहाटेपासून उत्साहाला उधाण आले. गावचे प्रमुख दैवत असलेल्या श्रीराम मंदिरात पहाटेपासून भाविकांची रीघ, सकाळी ९.३० वाजता जन्मोत्सव व पुष्पवृष्टी कीर्तनास प्रसिध्द कीर्तनकार हभप आत्माराम शास्त्री, रामायण व भागवत ग्रंथाचा गाढा अभ्यास असल्याने शास्त्रीबुवांनी तब्बल २५ ते ३० हजार भाविकांना रामजन्मोत्सवाच्या कीर्तनाने मंत्रमुग्ध केले. बरोबर १२.४० वाजता पुष्पवृष्टी होऊन गावातील सुवासिनींनी जन्मोत्सवाचा पाळणा सुरेल आवाजात सादर केला.नवी मुंबई : राम मारुती जन्मोत्सव मंडळ, बेलापूर यांच्या वतीने रामनवमीचा उत्सव साजरा करण्यात आला. आज पहाटेपासून सुरू असलेल्या या उत्सवात रामाच्या मूर्तीची विधिपूर्वक पूजा करण्यात आली. सकाळपासून हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.च्बेलापूर गावात गेली १५० वर्षे रामजन्मोत्सव साजरा केला जात आहे. पहाटे ५ वाजता श्रीराम स्तोत्राचे पठण करून त्यानंतर काकड आरती करण्यात आली. त्यानंतर हरिपाठ, कीर्तन आणि रामरायाचा अभिषेक झाला. १२.३९ वाजता रामजन्म झाला. गावातील महिलांनी पाळणा गात मोठ्या उत्साहात रामजन्मोत्सव साजरा केला. गावातील भजन मंडळाच्यावतीने दिवसभर संगीत भजनाचे कार्यक्रम सादर करण्यात आले. बेलापूरमधील रामजन्मोत्सव पाहायला हजारो भाविकांनी गर्दी केली. विज्ञान म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली उत्तम आणि शिस्तबद्ध आयोजन करण्यात आले.च्सीबीडी सेक्टर- २ मधील अलबेला हनुमान मंदिर ट्रस्टच्यावतीने रामजन्मोत्सव सोहळा साजरा केला. या सोहळ्यासाठी परिसरातील असंख्य नागरिकांनी गर्दी केली होती. येथील महिलांनी मिळून पाळणा सजवून साग्रसंगीत पूजा केली. संपूर्ण मंदिराला रोषणाई करण्यात आली आहे. या मंदिरात हनुमान जयंतीपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. पालखी सोहळा नागोठणे : रामनवमीचा सोहळा येथील प्रभू आळी आणि जोगेश्वरीनगरमधील मंदिरांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने जोगेश्वरीनगरमध्ये पालखी सोहळ्याचे आयोजन केले होते. या पालखी सोहळ्यात रामभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.