‘रामलीला’ चणिया-चोलीची धूम
By admin | Published: September 22, 2014 12:37 AM2014-09-22T00:37:55+5:302014-09-22T00:37:55+5:30
संजय लीला भन्साळीच्या ‘रामलीला’ या चित्रपटात दीपिका पदुकोण ढोल बाजे... या गाण्यावर बेफाम होऊन नाचली आहे. या गाण्यात दीपिकाने घातलेली चणिया-चोली ही रामलीला चणिया-चोली नावाने प्रसिद्ध झाली
जान्हवी मोर्ये, ठाणे
संजय लीला भन्साळीच्या ‘रामलीला’ या चित्रपटात दीपिका पदुकोण ढोल बाजे... या गाण्यावर बेफाम होऊन नाचली आहे. या गाण्यात दीपिकाने घातलेली चणिया-चोली ही रामलीला चणिया-चोली नावाने प्रसिद्ध झाली. या चित्रपटाला वर्ष उलटून गेले तरी आजही रामलीला चणिया-चोलीची यंगीस्तानमधील धूम कायम आहे. कारण, चित्रपटातील पेहरावाची भुरळ आजही शहरी तरुण पिढीला कायम आहे. यंदाही बाजारात तरुणींकडून गरबा व दांडिया नृत्यासाठी रामलीला चणिया-चोली खरेदी केली जात आहे.
रामलीला चणिया-चोलीचा घेर जास्त आहे. गुजराती व राजस्थानी चणिया-चोलीचा मिलाफ यात पाहायला मिळतो. कमरेला फिटिंग असते. गरबा व दांडिया नृत्य खेळण्यासाठी लागणारे नवीन पॅटर्नचे ड्रेस बाजारात बरेच आले आहेत. मुलींच्या तुलनेत मुलांचा ड्रेस घेण्याकडे कल कमी आहे. शाळांमध्ये नवरात्री सेलिब्रेशन होत असल्याने लहान मुलांमध्ये ड्रेसची खरेदी जास्त प्रमाणात केली जाते. मुलींचे ड्रेस २०० पासून अडीच ते तीन हजार रुपयांपर्यंत बाजारात उपलब्ध आहेत. मुलांसाठी ३०० पासून १२०० रुपयांपर्यंतचे ड्रेस उपलब्ध आहेत. चणिया-चोलीबरोबर नव्या पद्धतीचे जॅकेटही बाजारात आले आहेत. त्यावर खास गुजराती-काठियावाडी स्टाइलच्या कवड्या, काचा लावलेली कलाकुसर पाहायला मिळते. आई-वडील मुलांची हौस म्हणून ड्रेस खरेदी करतात. उत्सवाच्या डोंबिवली नगरीत नवरात्रीला दक्षिण भारतीय व मराठी लोकांसह गुजराती लोकांचा कल ड्रेस खरेदी करण्याकडे जास्त आहे, अशी माहिती विक्रेत्या धीरजबेन ठक्कर यांनी दिली. ड्रेसला शोभेसे आॅक्साइड दागिने बाजारात मिळतात. ड्रेससोबत दागिनेही खरेदी केले जातात. त्यामध्ये कानातले, गळ्यातले यासोबत निआॅन कड्यांची रंगसंगती खूप खुलून दिसते. मोती, खडे, कुंदन लावलेल्या दोन कड्यांची जोडी, चणिया-चोलीवर मॅचिंग असे कंबरपट्टेदेखील आहेत. त्यातही मोती आणि मेटलबरोबरच व्हेलवेटचे गोल लावलेले किंवा चौकानी मेटलचे कंबरपट्टेदेखील मिळतात. हे दागिने ७५ ते ३०० रुपयांना मिळतात. पायात घालण्यासाठी विविध रंगांच्या ज्यूटच्या, राजस्थानी मोजडी देखील १५० रुपयांपर्यंत मिळतात.