मुंबई – दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक आझाद मैदानात मागील ४८ वर्षापासून रामलीला आयोजित केली जाते. यात अखेरच्या दिवशी रावण दहन करण्यात येते. पंरतु यंदा आझाद मैदानात शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. त्यामुळे १ दिवस आधीच रावण दहन करा यासाठी मुख्यमंत्री शिंदेकडून दबाव टाकला जात असल्याचा आरोप होत आहे. त्याबाबत ठाकरे गट आणि काँग्रेसकडून विरोध केला जात आहे.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी १ दिवस आधीच रावण दहन करा असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रामलीला आयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले असं बोलले जात आहे. शुक्रवारी शिवसेनेने दसरा मेळाव्यासाठी टीझर प्रसिद्ध केला. त्यात हिंदुत्व आणि बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा उल्लेख आहे. आझाद मैदानात साहित्य कला मंडळ आणि महाराष्ट्र रामलीला मंडळाकडून अनेक वर्षापासून रामलीलाचं आयोजन करण्यात येते.
या मंडळांनी कायदेशीरपणे २४ ऑक्टोबरला पोलीस आणि बीएमसीकडून परवानगी घेतली. परंतु मुख्यमंत्री शिंदे यांच्या दसरा मेळाव्यामुळे आता १ दिवस आधीच रावण दहन करण्याची त्यांच्यावर वेळ आली आहे. याबाबत महाराष्ट्र रामलीला मंडळाचे उपाध्यक्ष संदीप शुक्ला म्हणाले की, आमच्या पदाधिकाऱ्यांवर सरकारकडून दबाव येत आहे. ज्यामुळे आमची ४८ वर्षांची परंपरा खंडीत होणार आहे. रावण दहन हे दसऱ्याच्या मुहुर्तावर केले जाते. परंतु आता १ दिवस आधीच रावण दहन करावे लागणार आहे.
ठाकरे गट आणि काँग्रेसची टीका
मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी दसरा मेळाव्यावरून टीका केली आहे. राजकीय स्वार्थासाठी परंपरा मोडली जातेय. दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी रावण वध केला जातो. मात्र यंदा मेळाव्यामुळे दबाव टाकला जात आहे. सरकार रामभक्तांचा अपमान करतंय हे आम्ही खपवून घेणार नाही. रामलीलाची परंपरा कायम राहिली पाहिजे आणि दसऱ्याच्या दिवशीच रावण दहन व्हावं यासाठी वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री शिंदे-उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र पाठवले.
तर आझाद मैदानात परंपरेनुसार रामलीला होते, पण फुटीर गटाचे मुख्यमंत्री त्यांनी रामलीला हटवायला सांगितली. रावण वध २ दिवस आधी करा असं त्यांना सांगितले, रामराज्याभिषेक नाही केला तरी चालेल. हे नवीन वाल्मिकी आलेत, नवीन रामायण लिहिलं जातंय. त्यामुळे जनता हे पाहतेय असं सांगत संजय राऊतांनी शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यावरून जोरदार निशाणा साधला.