मुंबई - हैदराबादमधील रामोजी फिल्मसिटी चित्रपट निर्मितीत करिअर घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत फिल्म मेकिंग कोर्स घेऊन आली आहे. या अभ्यासक्रमांमध्ये रामोजी ॲकॅडमी ऑफ मूव्हीजच्या माध्यमातून चित्रपट निर्मितीच्या विविध अंगांचे ऑनलाइन प्रशिक्षण दिले जाणार आहे.
देशातील प्रसिद्ध रामोजी ॲकॅडमी ऑफ मूव्हीजने फिल्म मेकिंग कोर्स करण्यासाठी मोफत ऑनलाइन क्लासेसची ऑफर दिली आहे. दिग्दर्शन, ॲक्शन, चित्रपट निर्मिती, चित्रपट एडिटिंगसोबतच अभिनय करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ही जणू एक सुवर्ण संधी आहे. रामोजी फिल्मसिटी येथील रामोजी ग्रुपची डिजिटल फिल्म अकादमी असलेल्या रामोजी अकादमी ऑफ मूव्हीजने इंग्रजी व्यतिरिक्त हिंदी, मराठी, तेलुगू, मल्याळम, तमिळ, कन्नड आणि बांगला यांसह सात भारतीय भाषांमध्ये ऑनलाइन फिल्म मेकिंग कोर्सेसची घोषणा केली आहे. या अभ्यासक्रमांमध्ये कथा आणि पटकथा, दिग्दर्शन, कृती, चित्रपटनिर्मिती, चित्रपट संपादन आणि डिजिटल फिल्म मेकिंग यांचा समावेश आहे. हा अभ्यासक्रम हिंदी भाषेतही असणार आहे. यासाठी इच्छुकांना रामोजी अॅकॅडमी डॉट कॉम या संकेतस्थळावर लॉग इन करावे लागणार आहे. या अभ्यासक्रमांसाठी नोंदणी करण्यासाठी कोणतीही उच्च वयोमर्यादा किंवा किमान पात्रतेची गरज नाही. किमान वयाची अट १५ वर्षे असून, अभ्यासासाठी निवडलेल्या भाषेत प्रावीण्य असणे अनिवार्य आहे.