आरक्षणाच्या मागणीसाठी रामोशी समाजाचा मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2017 03:03 PM2017-08-08T15:03:03+5:302017-08-08T15:03:06+5:30
मुंबई, दि. 8 - अनुसूचित जमातीमध्ये (एसटी) आरक्षण देण्याची मागणी करत हजारो रामोशी, बेरड, बेडर समाज बांधवांनी मंगळवारी आझाद मैदानात धडक मोर्चा काढला आहे. सधेयै व्हीजेएनटी आणि एनटीमध्ये विभागलेल्या या समाजाला एसटी प्रवर्गात संरक्षण देण्याचे आवाहन समाजाच्या कृती समितीने केले आहे.
महाराष्ट्र राज्य बेरड, बेडर, रामोशी समाज कृती समितीने काढलेल्या मोर्चात हजारो लोकं प्रथमच आझाद मैदानात एकवटले आहेत. गतवर्षी आद्य क्रांतीकारक राजे उमाजी नाईक यांची २२५ वी जयंती साजरी करताना पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांनी नाईक यांची शासकीय जयंती साजरी करण्याचे आश्वासित केले होते. मात्र वर्ष उलटण्यास आले असून अद्याप याबाबतचा निर्णय शासनाने जाहीर केला नसल्याचा आरोप कृती समितीचे अध्यक्षदौलत शितोळे यांनी केला आहे.
सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये उमाजी नाईक यांची जयंती ७ सप्टेंबरला साजरी करावी, पुरंदर तालुक्यातील भिवडी या त्यांच्या जन्मगावी उमाजी नाईक यांचे राष्ट्रीय स्मारक उभारावे, शासनाने व धनदांडग्यांनी बळकावलेल्या इनामी जमिनी समाजातील लोकांना बिनशर्त परत कराव्यात अशा विविध मागण्यांवर मुख्यमंत्र्यांनी चर्चा करावी, असे निवेदन कृती समितीने सरकारला दिले आहे.