विक्रमगड : तालुक्यातील रामपूर (गावीतपाडा) येथे १९७२ च्या महसूल गावाप्रमाणे रामपूर हे महसूल गाव असून या सर्व नागरीकांना शेतकऱ्यांना ७/१२ च्या उताऱ्यावर रामपूर असे नाव असणे अपेक्षित असतानाही गेल्या अनेक वर्षे खोस्ते गावाचा उल्लेख केला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना विविध योजनेच्या लाभासाठी अनेक अडचणी येत आहे. या नावात बदल करण्यासाठी गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून वरीष्ठ कार्यालयापासून ते तहसील कार्यालयापर्यंत कागदपत्राची पूर्तता केली असून अजून पर्यंत या सातबारातील गाव बदलले नसल्याची माहिती दिलीप भोये (कृती समितीचे सचिव) यांनी दिली.खोस्ते ही ग्रुप ग्रामपंचायत असून रामपूर (गावीतपाडा) हे महसूली गाव आहे व महसूली गावाच्या नावे ७/१२ लिहिले जावेत यासाठी आज तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. ही दिरंगाई प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे झाली असून त्याचे नुकसान सर्वसामान्य शेतकऱ्यांना सहन करावे लागत आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाने याबाबत लवकरात लवकर निर्णय घेतला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा या कृती समितीने दिला आहे.या फरकामुळे शासकीय योजनांचा लाभ घेणे तसेच जमिनीच्या खरेदी विक्रीचे व्यवहार करणे यात स्थानिकांना मोठी अडचण जाणवते आहे. (वार्ताहर)
विक्रमगड तहसीलवर रामपूर गावितपाड्याच्या रहिवाशांचा मोर्चा
By admin | Published: July 04, 2015 11:31 PM