Join us

भायखळा पोलीस ठाण्यात ‘रॅम्पवॉक’! तुंबणाऱ्या पाण्यावर जालीम उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 2:56 AM

मुसळधार पावसामुळे मुंबईभर पाणी तुंबले असताना, भायखळा पोलिसांनी मात्र तुंबणाऱ्या पाण्यावर जालीम उपाय काढला आहे.

मुंबई : मुसळधार पावसामुळे मुंबईभर पाणी तुंबले असताना, भायखळा पोलिसांनी मात्र तुंबणाऱ्या पाण्यावर जालीम उपाय काढला आहे. पोलीस ठाण्याच्या आवारात पाणी तुंबल्याने तक्रारदारांना पोलीस ठाण्यात येणे जिकिरीचे झाले होते. त्यावर उपाय म्हणून पोलिसांनी ठाण्याच्या मुख्य प्रवेशद्वारापासून कार्यालयापर्यंत रॅम्प टाकल्याचे चित्र मंगळवारी पाहायला मिळाले.मुंबईभर कोसळणाºया जलधारांमुळे दरवर्षी भायखळा पूर्वेकडील भायखळा पोलीस ठाण्याच्या आवारतही पाणी तुंबते. केवळ पोलीस ठाणेच नव्हे, तर येथील मोतीशाह लेनपासून भायखळा पोलीस वसाहतीपर्यंत पाण्याचा वेढा असतो. अशा परिस्थितीत तक्रार नोंदविण्यासाठी येणाºया नागरिकांना पोलीस ठाणे गाठणे मुश्कील होते. त्यावर मार्ग काढत पोलिसांनी प्रवेशद्वारापासून ठाणे कार्यालयापर्यंत तात्पुरत्या रॅम्पची उभारणी केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश कदम यांनी दिली.एकीकडे पावसाचे पाणी साचल्यानंतर, पोलीस ठाण्याचा परिसर जलमय झाल्याचे दिसत होते. मुसळधार पावसामुळे आवारातील दुचाकीही पाण्यात आडव्या पडल्या होत्या, तर दुसरीकडे पोलिसांसह सर्वसामान्य नागरिक असो वा आरोपी हे सर्वच रॅम्पवॉक करत पोलीस ठाण्यात प्रवेश घेताना पाहायला मिळाले.मुंबई महापालिकेचे कर्मचारी मुख्य प्रवेशद्वाराबाहेर पंप लावून पाणी उपसण्याचे काम करत होते. मात्र, साचलेल्या पाण्याची कोणतीही अडचण नागरिकांना होऊ नये, याची पूर्व खबरदारी भायखळा पोलिसांनी घेतल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे केवळ पोलीसच नव्हे, तर सर्वच शासकीय, निमशासकीय आणि सार्वजनिक यंत्रणांनी अडचणींचा पाढा न वाचता, त्यावर मार्ग काढण्याची शिकवण भायखळा पोलीस देत असल्याची चर्चा येथील नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :मुंबईपाऊसपोलिस