मुंबई: निवडणुका आल्यामुळेच उद्धव ठाकरे यांना राम मंदिराची आठवण झाली आहे. शिवसेनेने यापुर्वी राम मंदिराचा मुद्दा गांभीर्याने घेतला नव्हता. सध्या राम मंदिराविषयी नवनवीन वक्तव्ये येत आहेत. या साऱ्या पाठीमागे राजकारण असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केला आहे.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात २५ नोव्हेंबरला अयोध्याला जाणार असल्याचे जाहीर केले होते. राम मंदिराचा मुद्दा हा सुद्धा तुमच्यासाठी चुनावी जुमला आहे का, असा सवाल करतानाच जगभर फिरणाºया नरेंद्र मोदी यांनी चार वर्षात अयोध्येला एकदातरी भेट दिली का, असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला होता. राम मंदिरासाठी अयोध्या दौरा करण्याच्या ठाकरे यांच्या घोषणेवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी टीका केली आहे. निवडणुका आल्यामुळेच मंदिराचा मुद्दा पुढे रेटला जात असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. यावेळी चव्हाण यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरही टिकास्त्र सोडले. भारत संविधानाच्या आधारे चालणारा देश आहे. न्यायालयाचा एखादा निर्णय असेल तर संपूर्ण देशाला तो मान्य असतो. राम मंदिराचा मुद्दा श्रद्धेचा आहे, त्यामुळे न्यायालय हा प्रश्न सोडवू शकत नाही, ही भूमिका चुकीचे असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.राम मंदिराबाबत शिवसेनेने घेतलेल्या आक्रमक भूमिकेवर मनसेकडूनही टीका होत आहे. तुमच्या अयोध्यावारीने मुंबईतील प्रश्न सुटणार असतील तर त्याला आमच्या शुभेच्या, असे खोचक पोस्टरच मनसेने शिवसेना भवननासमोर लावले आहेत.>जागावाटप अंतिम टप्प्यातराष्ट्रवादी काँग्रेससोबत आमची चर्चा सुरू असून जागावाटपाची बोलणी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी शनिवारी दिली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या निवासस्थानी याबाबत बैठक झाली. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, माणिकराव ठाकरे, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ उपस्थित होते. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणीला वेग आला. काँग्रेसने राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र सुजय यांच्यासाठी राष्ट्रवादीकडून अहमदनगरची जागा मागितली आहे. तर, या जागेच्या बदल्यात उत्तर-मध्य मुंबईची जागा मागितली आहे. याशिवाय, राष्ट्रवादीने पुण्याच्या जागेवरही दावा सांगितला आहे. तसेच यावेळी जागावाटपाचे सूत्र ५०-५० असे ठेवण्याची मागणीही राष्ट्रवादीने केली आहे.
निवडणुका आल्यानेच रामाची आठवण- अशोक चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 5:23 AM