Join us

मोठी बातमी: राणा दाम्पत्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संजय राऊतांसह शिवसैनिकांविरोधात तक्रार, केले गंभीर आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2022 6:42 PM

Shiv Sena Vs Ravi Rana & Navneet Rana: पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर राणा दाम्पत्यानेही शिवसेनेविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. राणा दाम्पत्याने गंभीर आरोप करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह खासदार संजय राऊत, अनिल परब आणि ५०० ते ६०० शिवसैनिकांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

मुंबई - आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत कौर राणा यांनी मातोश्रीवर येऊन हनुमान चालिसा पठण करण्याचे आव्हान दिले होते. त्यावरून आज मुंबईमध्ये राणा दाम्पत्य आणि शिवसेना यांच्यात दिवसभर संघर्ष पाहायला मिळाला होता. त्यानंतर पोलिसांनी राणा दाम्पत्याला ताब्यात घेतले होते. दरम्यान, रवी राणा आणि नवनीत राणा यांना पोलिसांनी अटक केल्याचे वृत्त आहे. तर राणा दाम्पत्यानेही शिवसेनेविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. राणा दाम्पत्याने गंभीर आरोप करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह खासदार संजय राऊत, अनिल परब आणि ५०० ते ६०० शिवसैनिकांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

रवी राणा आणि नवनीत राणा यांनी दाखल केलेली तक्रार पोलिसांनी स्वीकारल्याचे प्राथमिक वृत्त आहे. आपल्या घराबाहेर जमाव जमवून गर्दी करणे. तसेच आपल्या जीविताला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न करणे, अशा प्रकारची तक्रार राणा दाम्पत्याने केली आहे. संजय राऊत यांनी प्रक्षोभक विधाने करून शिवसैनिकांना चिथावणी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. आता पोलीस या तक्रारीवर काय कारवाई करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

काल झालेल्या बैठकीमध्ये आजच्या दिवसभराच्या घडामोडींचा आराखडा तयार करण्यात आला. त्यासाठी मातोश्रीसमोर जमाव जमवण्यात आला. संजय राऊत यांनी ट्विट करून जमावाला चिथावणी दिली. आम्ही केवळ हनुमान चालिसा म्हणणार होतो. मात्र आमच्या जीवितास धोका निर्माण होईल, अशी चिथावणी दिली गेली. आमच्या घराबाहेर अॅंब्युलन्स आणल्या गेल्या. आता आमच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास त्यासाठी उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि अनिल परब जबाबदार असतील, असेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संजय राऊत, अनिल परब यांच्यासह ७०० शिवसैनिकांवरही  कलम १२०ब, १४३, १४८, १४९. ४५२, ३०७, १५३अ, २९४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राणा दाम्पत्याने केली आहे. आता पोलीस या तक्रारीवर काय कारवाई करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.  

टॅग्स :रवी राणानवनीत कौर राणाउद्धव ठाकरेसंजय राऊत