Yes Bank: राणा कपूरच्या कन्या आता सीबीआयच्याही रडारवर; ईडी कोठडीची मुदत बुधवारी संपणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 01:16 AM2020-03-11T01:16:46+5:302020-03-11T01:17:27+5:30
येस बँकेतील कर्ज घोटाळा प्रकरण; सात ठिकाणी छापे
मुंबई : हजारो कोटींचा कर्ज घोटाळा करून बॅँकेच्या खातेदारांना अडचणीत आणलेल्या येस बॅँकेचा संस्थापक राणा कपूर आणि त्याची पत्नी व मुली आता केंद्रीय गुन्हा अन्वेषण शाखेच्या (सीबीआय) रडारवर आहेत. मुंबईत विविध सात ठिकाणी छापे टाकून महत्त्वपूर्ण दस्तऐवज जप्त केले. दरम्यान, राणा कपूर याच्या ईडी कोठडीची मुदत बुधवारी संपत आहे.
येस बॅँकेतील खातेदारांनी गुंतवलेल्या निधीतील फायदा राणा कपूर याने मुलींच्या नावे स्थापन केलेल्या कंपन्यांकडे वर्ग केल्याचे आतापर्यंतच्या तपासातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे तीनही मुली तपास यंत्रणेच्या रडार आल्या आहेत. सीबीआयने सोमवारी डीएचएफएल कार्यालय, सेनापती बापट मार्ग व एल्फिन्स्टन रोडवरील डीओआयटी अर्बन व्हेंचर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची दोन कार्यालये तसेच कपूरचे वरळी निवासस्थान, वांद्रे पश्चिमेत कपिल वाधवन यांचे फ्लॅट, नरिमन पॉइंट येथील राखी कपूरचा फ्लॅट आणि नरिमन येथील राधा कपूर खन्ना यांच्या फ्लॅटवर एकाचवेळी छापे मारले. सीबीआयने दाखल केलेल्या तक्रारीमध्ये कपूरची पत्नी बिंदू आणि तीन मुलींसह सात कंपन्या आणि अज्ञात अशा पाच कंपन्यांचा समावेश आहे. दिवान हाउसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडचे प्रवर्तक कपिल वाधवन आणि डीएचएफएलशी संबंधित कंपनी आरकेडब्ल्यू डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक धीरज राजेश कुमार वाधवन यांचाही आरोपी म्हणून समावेश केला असून, त्यांचे फ्लॅट व कार्यालयाच्या झडतीचे काम मंगळवारीही सुरू होते.
दरम्यान, कपूर यांची भारतात आणि परदेशात प्रचंड संपत्ती असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दिल्लीत कपूर यांच्या मालकीचा तब्बल ३८० कोटींचा बंगला असल्याचे समोर आले आहे. हा बंगला गौतम थापर या कर्जदाराने येस बँकेत गहाण ठेवला होता. मात्र कर्जफेड शक्य न झाल्याने थापर यांनी तो विकण्याचा निर्णय घेतला. मात्र राणानी तो बंगला बळकावला असल्याची चर्चा आहे. त्यासाठी पत्नी बिंदू कपूर यांच्या नावे बनावट कंपन्या स्थापन करून त्याद्वारे हा बंगला घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्या व्यवहाराची ‘ईडी’कडून चौकशी होण्याची शक्यता आहे.
ब्रिटन आणि फ्रान्समध्ये आलिशान घरे
राणा कपूर यांनी भारतातच नव्हेतर, परदेशातही स्थावर मालमत्ता खरेदी केली आहे. इंडिया बुल्सच्या एका प्रोजेक्ट्मध्ये त्यांचे ८ ते ९ फ्लॅट आहेत. अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनमध्ये स्थावर मालमत्ता आहे.