मुंबई : ‘मनी लॉड्रिंग’च्या आरोपावरून रविवारी सकाळी अटक केलेले येस बँकेचे संस्थापक अध्यक्ष राणा कपूर यांनी केलेली सुमारे दोन हजार कोटी रुपयांची संशयास्पद गुंतवणूक, करेदी केलेली ४४ महागडी रंगचित्रे आणि सुमारे एक डझन कथित बोगस कंपन्या अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) चौकशीच्या रडारवर आहेत.
विश्वसनीय सूत्रांनी सांगितले की, कपूर कुटुंबाच्या लंडनमध्येही स्थावर मालमत्ता असल्याचे दाखविणारी कागदपत्रेही तपासामध्ये ‘ईडी’च्या हाती लागली असून त्यासाठी त्यांनी पैसा कुठून आणला याची चौकशी करण्यात येत आहे.
कपूर यांच्या दक्षिण मुंबईतील आलिशान निवासस्थानावर शुक्रवारी टाकलेल्या धाडीने या तपासाची सुरुवात झाली. येस बँकेतील घोटाळ््याशी संबंधित दिवाण हाऊसिंग फायनान्सशी संबंधित एका कंपनीकडून कपूर कुटुंबाच्या नियंत्रणाखाली असलेल्या एका कंपनीला दिली गेलेली ६०० कोटी रुपयांची संशयास्पद रक्कम हा तपासाचा मुख्य केंद्रबिंदू आहे, असेही सूत्रांनी सांगितले.कपूर यांच्याशी संबंधित ज्या कंपनीला ही रक्कम मिळाली तिचे नाव डूइट अर्बन व्हेंचर्स (इंडिया) प्रा. लि. अशी आहे. येस बँकेने दिवाण हाऊसिंगला दिलेले सुमारे ३००० कोटी रुपयांचे कर्ज परतफेडीच्या दृष्टीने अडचणीत आले असताना या रकमेची देवाणघेवाण झाली हे लक्षणीय आहे. बँकेने दिवाण हाऊसिंगला केलेल्या या कर्जवाटपाचीही चौकशी सुरु आहे.
सूत्रांनी सांगितले की, दिवाण हाऊसिंगचे कर्ज ‘बुडित खात्या’त जाऊनही येस बँकेने त्यावर लगेच कायद्यानुसार कारवाई सुरु केली नाही. कदाचित थकित कर्जाची सक्तीने वसुली न करण्यासाठी हे ६०० कोटी रुपये कपूर यांना लाच म्हणून दिले असावेत का, या अनुषंगाने तपास करण्यात येत आहे. कपूर यांनी गुन्हेगारीतून मिळालेला पैसा कुठे व कसा फिरविला याचा शोध घेण्यासाठी ‘ईडी’ने त्यांची पत्नी बिंदू व दोन मुलींच्या घरांचीही झडती घेतली व त्यांचेही जाबजबाब नोंदविले आहेत. याच झडती व जबान्यांमधून कपूर कुटुंबाची सुमारे दोन हजार कोटी रुपयांची संशयास्पद गुंतवणूक, डझनभर बनावट कंपन्या व काही राजकीय नेत्यांसह इतरांकडून खरेदी केलेल्या ४४ मौल्यवान चित्रांची माहिती उघड झाली.सीबीआयने नोंदविला भ्रष्टाचाराचा गुन्हावर उल्लेख केलेल्या ६०० कोटी रुपयांच्या संशयास्पद व्यवहाराच्या संदर्भात केंद्रीय गुप्तचर विभागाने (सीबीआय) राणा कपूर, त्यांची डूइट अर्बन व्हेंचर्स ही कंपनी, दिवाण हाऊसिंग फायनान्स आणि त्या कंपनीचे प्रवर्तक कपिल वाधवा यांच्याविरुद्ध भ्रष्टाचारासह अन्य फौजदारी कलमांखाली रविवारी स्वतंत्र गुन्हा नोंदविला. याचा तपास सीबीआय स्वतंत्रपणे करेल व ‘ईडी’ची कोठडी संपली की या आरोपींना ताब्यात घेईल, असे कळते.मुलींना देश सोडण्यास मनाईराणा कपूर याच्या मुलीविरुद्ध लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. रविवारी त्या लंडनला जाण्यासाठी मुंबई विमानतळावर पोहचल्या असताना त्यांना अडविण्यात आले. रात्रीच्या विमानाने त्या लंडनला जाणार होत्या. दरम्यान राणा कपूरला पुन्हा जीटी रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेले आहे.