२६/११ पूर्वी राणा होता मुंबईतच; पाकच्या अधिकाऱ्यांच्याही संपर्कात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 12:14 PM2023-09-27T12:14:59+5:302023-09-27T12:15:27+5:30

पोलिसांचा आरोपपत्रात दावा; पाकच्या अधिकाऱ्यांच्याही संपर्कात

Rana was in Mumbai before 26/11; Also in touch with Pakistani authorities | २६/११ पूर्वी राणा होता मुंबईतच; पाकच्या अधिकाऱ्यांच्याही संपर्कात

२६/११ पूर्वी राणा होता मुंबईतच; पाकच्या अधिकाऱ्यांच्याही संपर्कात

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : २६ नोव्हेंबर २००८ च्या दहशतवादी हल्ल्याला जवळपास १५ वर्षे पूर्ण होत असताना याप्रकरणी पुन्हा एकदा मुंबईच्या क्राईम ब्रँचने कॅनडाचा नागरिक व या हल्ल्याच्या कटात सहभागी असल्याचा आरोप असलेल्या तहव्वूर राणाविरोधात ४०५ पानांचे पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे.
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम मंगळवारी विशेष न्यायालयात हजर राहिले. आरोपपत्राची प्रत सोमवारीच विभागात सादर करण्यात आली. मात्र, काही औपचारिकता पूर्ण न झाल्याने बुधवारी न्या. राहुल रोकडे यांच्यापुढे आरोपपत्र सादर करण्यात येईल, अशी माहिती निकम यांनी दिली. 

राणा सध्या अमेरिकेत नजरकैदेत आहे. २६/११ च्या हल्ल्यातील महत्त्वाचा आरोपी व पाकिस्तानी-अमेरिकन दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडलीचा निकटवर्तीय असलेल्या राणावर अनेक आरोप ठेवलेले आहेत. हेडली यास रेकी करण्यासाठी भारतात यायचे होते. त्यावेळी राणाने त्याला बनावट कागदपत्रांच्या आधारे भारताचा टुरिस्ट व्हिसा मिळवून दिला, असे खुद्द डेव्हिड हेडलीने विशेष न्यायालयाला दिलेल्या साक्षीत म्हटले होते. हेडलीमुळे राणाची या हल्ल्यातील भूमिका समोर आली. 

राणा मुंबईवरील हल्ल्यापूर्वी  ११ नोव्हेंबर २००८ ते २१ नोव्हेंबर २००८ पर्यंत मुंबईतच होता, असा दावा पोलिसांनी केला आहे. त्याच्या मुंबईतील वास्तव्याशी संबंधित सर्व कागदोपत्री पुरावे उपलब्ध असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. ‘राणाच्या मुंबईतील वास्तव्यासंबंधी आम्हाला काही कागदोपत्री पुरावे सापडले आहेत आणि त्याच्याविरोधात असलेल्या काही साक्षींमुळे राणाचा २६/११ च्या दहशतवादी कटातील सहभाग सिद्ध झाला आहे. 

१६० जणांचा मृत्यू
समुद्रामार्गे आलेल्या १० पाकिस्तानही दहशतवाद्यांनी देशाच्या आर्थिक राजधानीला तब्बल ७० तास वेठीस धरले. ताज, ओबेरॉय ही पंचतारांकित हॉटेल्स, कॅफे लिओपर्ड, कामा  रुग्णालय, नरिमन हाऊस या ठिकाणी हल्ले केले. या हल्ल्यात १६० जणांचा मृत्यू झाला. त्यात परदेशी नागरिकांचाही समावेश होता. 
 कसाबला फाशी   
१० दहशतवाद्यांपैकी अजमल कसाबला जिवंत पकडण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर त्याच्यावर खटला चालवून त्याला फाशीची शिक्षा ठोठाविण्यात आली.  नोव्हेंबर २०१२ मध्ये येरवडा कारागृहात त्याच्या शिक्षेवर अंमलबजावणी करण्यात आली.

राणाला ३५ वर्षे कारावासाची शिक्षा
राणा पाकिस्तानी लष्कराच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात होता, असेही निकम यांनी सांगितले. पाकिस्तानात जन्मलेला; परंतु, अमेरिकेचा नागरिक असलेला हेडली २६/११च्या हल्ल्यातील त्याच्या भूमिकेसाठी अमेरिकेत ३५ वर्षे कारावासाची शिक्षा भोगत आहे. हेडलीने मुंबईच्या विशेष न्यायालयात दिलेल्या साक्षीत या हल्ल्यामागे असलेल्या पाकिस्तानी गटाच्या कारवायांची सविस्तर माहिती दिली होती. त्याने दिलेल्या माहितीमुळे सरकारने इतर सहा जणांना आरोपी केले. त्यात राणाचा समावेश आहे. त्याने दिलेल्या माहितीमुळे त्याला जन्मठेपेची शिक्षा न ठोठाविता ३५ वर्षे कारावासाची शिक्षा ठोठाविण्यात आली. 

Web Title: Rana was in Mumbai before 26/11; Also in touch with Pakistani authorities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.