मुंबई : देशद्रोहप्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत व तिची बहीण रंगोली चंडेल यांना उच्च न्यायालयाने अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले. तसेच ८ जानेवारी रोजी वांद्रे पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे निर्देशही दिले.
‘तीन वेळा समन्स बजावूनही पोलिसांसमोर हजर झाला नाहीत. तुमच्या सोयीनुसार समन्सची कार्यवाही होणार का?’ अशा शब्दांत खंडपीठाने रनाैत भगिनींनाही सुनावले. कलम १२४-अ अंतर्गत गुन्हा नोंदविणे हे आम्हाला सकृतदर्शनी अयोग्य वाटते. पोलीस अनेक प्रकरणांत या कलमाचा वापर का करत आहेत, हे कळेनासे झाले आहे, असे म्हणत न्यायालयाने मुख्य सरकारी वकील दीपक ठाकरे यांना पोलिसांची यासंदर्भात कार्यशाळा घेण्याची सूचना देत याचिकेवरील सुनावणी ११ जानेवारी रोजी ठेवली.