मुंबई : मेट्रो-३ चे कारशेड आरे वसाहतीतच उभारण्याचा निर्धार नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने पहिल्याच दिवशी व्यक्त केला. त्यावर माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माझा राग मुंबईकरांवर काढू नका, असे सांगत आपण पर्यावरणवाद्यांच्या सोबत असल्याचा इशारा शुक्रवारी राज्य सरकारला दिला. त्यामुळे पुन्हा एकदा आरे येथील कारशेडवरून राजकारण तापण्याची चिन्हे आहेत.
देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात आरे येथे कारशेड उभारण्याचा निर्णय झाला होता. त्यासाठी न्यायालयीन परवानगीचे सोपस्कारही पार पाडण्यात आले होते. मात्र, पर्यावरणाचा मुद्दा पुढे करत शिवसेनेने आरे येथील कारशेडला विरोध दर्शवला. त्यानंतर, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येताच उद्धव ठाकरे यांनी आरेतील कारशेड कामाला स्थगिती दिली. विशेष म्हणजे ठाकरे सरकारचा हा पहिला निर्णय होता. तेव्हापासून कारशेडचा मुद्दा अधांतरीच आहे.आता, सत्तेवर आलेल्या एकनाथ शिंदे सरकारनेही पहिल्याच दिवशी आरे येथेच कारशेड उभारण्याचा निर्धार व्यक्त करत उद्धव ठाकरे यांना दणका दिला आहे. कारशेड आरेमध्येच करण्यास सरकार तयार असल्याची भूमिका न्यायालयात मांडण्याची सूचना राज्याच्या महाधिवक्त्यांना देण्यात आली आहे. आरे येथे कारशेड उभारण्याच्या शिंदे सरकारच्या निर्णयावर उद्धव ठाकरे यांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे.
प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेतजनतेच्या हिताचे प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत, यासाठी प्रयत्न आहे. जनतेच्या पैशांचा गैरवापर होता कामा नये. महाराष्ट्राच्या हिताचेच निर्णय हे युतीचे सरकार घेईल.- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
रात्रीस खेळ चाले हे त्यांचे ब्रीदवाक्य झाले आहे. एका रात्रीत आरेमध्ये झाडांची कत्तल झाली होती. मुख्यमंत्री झाल्यानंतर मी कांजूरमार्गचा पर्याय सुचवत कामाला स्थगिती दिली. मी पर्यावरणवाद्यांच्या सोबत आहे. संभ्रम निर्माण होतो, तेव्हा ती गोष्ट टाळलेली बरी. मुंबईच्या पर्यावरणाशी खेळू नका. तिथे झाडे तोडून झाली आहेत पण मधल्या काळात तिथे बिबट्या फिरतानाचा फोटो समोर आला होता. म्हणजे तिथे वन्यजीव आहेत. आरेचा मर्यादित वापर होणार होता. कांजूरला कारशेड गेल्यानंतर ती मेट्रो बदलापूर-अंबरनाथपर्यंत जाऊ शकेल.- उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री
आरे येथील मेट्रो कारशेडसंदर्भात आम्ही योग्य तो निर्णय घेऊच. उद्धव ठाकरे यांचा पूर्ण मान राखून मला असे वाटते की, आरे येथे कारशेड उभारणे हेच मुंबईकरांच्या हिताचे आहे. तिथे २५ टक्के काम झाले आहे. जिथे कारशेड २५ टक्के तयार झाले आहे तिथेच ते १०० टक्के तयार व्हावे, कारण त्याला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता आहे. आपल्याला मुंबईकरांचा विचार करावा लागेल. कारशेड हा अहंकाराचा विषय नाही तर मुंबईकरांच्या प्रवासी सुविधांचा विषय आहे.- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्रीमुंबईकरांशी खेळ : पहिल्याच बैठकीत मुंबई मेट्रो कारशेड आरे मध्येच होईल, असे जाहीर करून भाजपप्रणित राज्य सरकारने पहिला घाव मुंबईकरांवर घातला आहे. पर्यावरणाचा विचार करून आरेमधील कारशेड कांजूरमार्ग येथे करण्याचे प्रस्तावित केले आहे. परंतु पुन्हा आरेमध्येच कारशेड करण्याचा आग्रह धरणे म्हणजे मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळ चालवला आहे. - नाना पटोले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष