संघाने बिघडवले राणेंचे गणित

By admin | Published: April 17, 2015 12:15 AM2015-04-17T00:15:38+5:302015-04-17T09:08:56+5:30

वांद्रे पूर्व मतदारसंघात उत्तर भारतीय आणि मुस्लीम मतांवर विजयाचे आडाखे मांडणाऱ्या नारायण राणेंची सारी गणिते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बिघडवून टाकली.

Rana's mathematics team spoiled | संघाने बिघडवले राणेंचे गणित

संघाने बिघडवले राणेंचे गणित

Next

गौरीशंकर घाळे - मुंबई
वांद्रे पूर्व मतदारसंघात उत्तर भारतीय आणि मुस्लीम मतांवर विजयाचे आडाखे मांडणाऱ्या नारायण राणेंची सारी गणिते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बिघडवून टाकली. आधीच मराठी-अमराठी वादाने बिघडलेले हिंदू मतांचे समीकरण पोटनिवडणुकीच्या निमित्ताने आणखी बिघडवण्यास संघाने साफ नकार देत शिवसेना उमेदवारासाठी सक्रिय मोर्चेबांधणी केली. प्रसंगी स्थानिक भाजपा नेत्यांनाही फटकारत संघाने आपली मोहीम राबविल्याचा थेट फटका राणेंना बसल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत भाजपाला येथे २५ हजार मते मिळाली. यातील बहुतांश मते पारंपरिकदृष्ट्या शिवसेनाविरोधी आणि अमराठी होती. भाजपा नेत्यांशी असलेल्या सलगीचा फायदा घेत ही मते स्वत:कडे खेचण्याची रणनीती नारायण राणेंनी आखली होती. त्यासाठी काँग्रेसमधील कृपाशंकर सिंह आदी उत्तर भारतीय नेत्यांना प्रचारात उतरविण्यात आले. उत्तर भारतात प्रसिद्ध असणाऱ्या ‘चौपाही’ गप्पांचेही जागोजागी आयोजन करण्यात आले. मात्र, त्याचा फारसा परिणाम झाला नसल्याचे निकालांनी दाखवून दिले आहे.
अमराठी मते शिवसेनेच्या विरोधात पडतील अथवा निष्क्रिय बनतील, हे गृहितकच संघाच्या मोहिमेमुळे मोडीत निघाले. मागील विधानसभा निवडणुकीत युती फुटल्याने मुंबईत मराठी-अमराठी वाद उफाळून आला. या वादाचा भाजपाला लाभ झाला असला तरी ही फूट संघाच्या पचनी पडली नाही. वांद्रे पोटनिवडणुकीच्या निमित्ताने ही दरी आणखी वाढवायला संघ तयार नव्हता. ओवेसी बंधूंच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर हिंदू माणसांची एकजूट राहायला हवी, अशी भूमिका संघाने घेतली. स्थानिक भाजपा नेत्यांनाही संघाने चांगलेच फटकारले. कोणत्याही परिस्थितीत हिंदू मते फुटू द्यायची नाही, अशी भूमिका घेण्यात आली होती.

च्संघाच्या या मोहिमेमुळे वांद्रे पूर्वेसह मुंबईतील उत्तर भारतीय मतदारांवरील काँग्रेसची पकड सैल झाल्याचे पुन्हा एकदा उघड झाले.
च्नारायण राणेंना संघाच्या या मोहिमेचा फटका बसलाच. शिवाय, काँग्रेसमधील उत्तर भारतीय नेत्यांनाही महापालिकेची वाट खडतर असल्याचा इशारा दिला.

Web Title: Rana's mathematics team spoiled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.