Join us

‘ॲनिमल’चा पहिल्याच दिवशी ११६ कोटींचा गल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2023 9:27 AM

५४ कोटींच्या ओपनिंगसह 'ॲनिमल’ तिसऱ्या स्थानी; ॲडल्ट सिनेमाची मोठी झेप.

मुंबई : शुक्रवारी रिलीज झालेल्या रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ चित्रपटाने सगळीकडे धुमाकूळ घातला आहे. जनमानसांत प्रचंड कुतूहल असलेला हा सिनेमा सव्वातीन तासांपेक्षा जास्त मोठा असूनही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. याच बळावर या सिनेमाने ५४.७५ कोटी रुपयांच्या ओपनिंगसह भारतीय बाॅक्स ऑफिसवर सर्वाधिक ओपनिंग मिळवणाऱ्या हिंदी चित्रपटांच्या यादीत तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.ॲडव्हास बुकिंगमध्येही बाजी मारल्याने शुक्रवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास आयोजित करण्यात आलेल्या ‘ॲनिमल’च्या शोलासुद्धा प्रेक्षकांनी गर्दी केली होती. सोशल मीडियापासून समीक्षकांपर्यंत सर्वचजण रणबीरच्या अभिनयाचे कौतुक करत असून, ‘ॲनिमल’च्या प्रेमात आहेत. या सर्वांचा एकत्रित परिणाम बॅाक्स ऑफिसवर दिसत आहे. 

  आजवर बॅाक्स ऑफिसवर सर्वाधिक ओपनिंग मिळवणाऱ्या पाच हिंदी चित्रपटांच्या यादीत पहिल्या व दुसऱ्या स्थानी शाहरुख खानचा ‘जवान’ आणि ‘पठाण’ आहेत.   या दोन्ही सिनेमांनी पहिल्या दिवशी अनुक्रमे ६५.५० कोटी आणि ५५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.   यांच्या मागोमाग ५४.७५ कोटी रुपयांचा गल्ला जमवत ‘ॲनिमल’ने तिसरा क्रमांक पटकावला आहे.   यशचा ‘केजीएफ २’ हा चित्रपट ५३.९५ कोटींसह चौथ्या स्थानी, तर ऋतिक रोशन आणि टायगर श्रॅाफचा ‘वॅार’ ५१.६० कोटी रुपयांची कमाई करत पाचव्या स्थानी आहे.   ‘ॲनिमल’ने हिंदी वगळता इतर भाषांमधील चित्रपटांद्वारे ९.५ कोटी रुपयांचा गल्ला जमवत एकूण ६३.८० कोटी रुपयांचे नेट बॅाक्स ऑफिस कलेक्शन केले आहे.   जागतिक पातळीवर ‘ॲनिमल’ने ११६ कोटी रुपयांचा ग्रॅास बिझनेस केल्याचे प्रोडक्शन हाऊसच्यावतीने घोषित करण्यात आले आहे.

‘ॲनिमल’ चित्रपटाचा पहिल्या दिवसाचा प्रवास वाटतो तितका सोपा मुळीच नव्हता. विविध अडथळ्यांची शर्यत पार करत या चित्रपटाने यशाचा मार्ग शोधला आहे. ॲडल्ट ‘ए’ सर्टिफिकेट असूनही पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा हा पहिला चित्रपट बनला आहे. हा चित्रपट कोणत्याही सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी रिलीज झालेला नाही की कोणत्याही सणाच्या मुहूर्तावरही प्रेक्षकांसमोर आलेला नाही. हा  सुपरहिट चित्रपटाचा पुढील भाग नाही. यात कोणत्याही सुपरस्टारचा कॅमिओही नाही.

‘ॲनिमल’समोर ‘सॅम बहादूर’सारखा मोठा चित्रपट रिलीज झाला आहे. ‘ॲनिमल’चा कालावधीही सव्वातीन तासांपेक्षा जास्त आहे. इतक्या सर्व गोष्टी विरोधात असूनही ‘ॲनिमल’ने बॅाक्स ऑफिसवर निशाणा साधला असून, रणबीरच्या करिअरमधील सर्वाधिक ओपनिंग देणाऱ्या सिनेमाच्या यादीत या चित्रपटाने पहिला क्रमांक पटकावला आहे.

टॅग्स :मुंबईबॉलिवूडरणबीर कपूर