FTIIच्या विद्यार्थी आंदोलनाला रणबीरचा पाठिंबा
By admin | Published: July 9, 2015 11:01 AM2015-07-09T11:01:39+5:302015-07-09T11:17:38+5:30
अभिनेता रणबीर कपूरने एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांना पाठिंबा जाहिर करत विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल अशी व्यक्ती अध्यक्षपदी नेमावी असे मत व्यक्त केले आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ - 'फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टियूट' (एफटीआयआय) च्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीच्या निर्णयावरून सुरू असलेल्या वादात अभिनेता रणबीर कपूरनेही उडी घेतली आहे. चौहान यांच्या नियुक्तीच्या निर्णयाविरोधात एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांचे सुरू आंदोलन सुरू असून रणबीरने या विद्यार्थ्यांना पाठिंबा जाहिर केला आहे. ' विद्यार्थ्यांना ज्या व्यक्तीकडून प्रेरणा मिळेल अशा व्यक्तीची संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती व्हावी' असे मत एफटीआयआयच्या विद्यार्थी संघटनेने प्रदर्शित केलेल्या ध्वनीचित्रफितीमध्ये रणबीरने मांडले आहे.
' एफटीआयआय ही चित्रपट क्षेत्रातील अनेक नामवंत दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफर, एडीटर तसेच पुरस्कार विजेती व्यक्तीमत्व घडवणारी संस्था आहे. या संस्थेतून शिक्षण घेऊन बाहेर पडणा-या विद्यार्थ्याकडे बाहरेच्या जगात आदराने पाहिले जाते. मात्र गेल्या काही दिवसांपासून संस्थेविषयी नकारात्मक गोष्टी ऐकू येत आहेत. या संस्थेतील विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे, त्यांच्या मागण्या लक्षात घेतल्या पाहिजेत' असे रणबीरने या ध्वनीफितीत म्हटले आहे. तसेच सरकार आणि विद्यार्थ्यांदरम्यान सुसंवादाची गरज असल्याचे मतही त्याने व्यक्त केले.