Join us

रांचीचे पोलिसांचे पथक मुंबईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : झारखंडमधील झामुमो-काँग्रेस सरकार पाडण्यासाठीचा कट रचल्याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास करण्यासाठी रांची पोलिसांची दोन विशेष ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : झारखंडमधील झामुमो-काँग्रेस सरकार पाडण्यासाठीचा कट रचल्याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास करण्यासाठी रांची पोलिसांची दोन विशेष पथके मंगळवारपासून महाराष्ट्रात ठाण मांडून आहेत. आमदार खरेदी प्रकरणी भाजपच्या एका माजी मंत्र्यासह मुंबईतील काही नेत्यांचा त्यामध्ये सहभाग असल्याच्या शक्यतेने त्याचा शोध घेतला जात आहे. उपअधीक्षक नैथानी यांच्या नेतृत्वाखाली टीम त्यासाठी कार्यरत असल्याचे समजते.

याबाबत मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे संपर्क साधला असता त्यांनी काहीही भाष्य करणे टाळले. झारखंड सरकारमधील काँग्रेस व अपक्ष आमदारांना फोडण्याच्या कटात महाराष्ट्रातील भाजपाचे काही नेते सहभागी होते, अशी माहिती या प्रकरणात अटक केलेल्या पत्रकार व कार्यकर्त्यांनी दिली आहे. त्यामध्ये माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, नागपुरातील चरणसिंग ठाकूर, जयकुमार बेलखेडे, तसेच मुंबईतील अनिल यादव, मोहित भारतीय, आशुतोष ठक्कर यांचा समावेश असल्याचे सांगितले जाते.

मुंबईतील मंडळींसाठी रांचीतील हॉटेल सी लिंकमध्ये ऑनलाइन २१ ते २४ जुलै या कालावधीसाठी ४ खोल्या बुक करण्यात आल्या होत्या. त्यानुसार ते २१ जुलैला हॉटेलमध्ये गेले. २२ जुलैला रात्री ८.१० वाजता हॉटेलवर तेथील पोलिसांनी छापा टाकला. मात्र त्याच्या काही मिनिटापूर्वी भाजपच्या नेत्यांना त्याची कुणकुण लागल्याने ते हॉटेलमधून बाहेर पडले असे सांगितले जात आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी दोन पथके महाराष्ट्रात आली आहेत. एकूण दहा जणांचा त्यामध्ये समावेश असून मुंबई व नागपूरमध्ये जाऊन चौकशी केली जाणार आहे. त्यांचा ठावठिकाणा शोधला जात असून याबाबत प्रचंड गुप्तता बाळगण्यात येत आहे.