मुंबई : कोंबडीवड्यांचे स्टॉल्स लावल्यानंतर आता काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी मरिन ड्राइव्ह येथील खुल्या व्यायामशाळेविरोधात कोर्टात धाव घेतली आहे़ पदपथावरील अतिक्रमणाबाबत पालिकेच्या दुटप्पी भूमिकेबद्दल राणे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे़ त्यामुळे सत्ताधारी शिवसेनेबरोबरच पालिका प्रशासनही अडचणीत आले आहे़मरिन ड्राइव्हवरील खुल्या व्यायामशाळेला शिवसेनेचे अभय असल्याने विरोधी पक्षांनी याविरोधात बंड पुकारले आहे़ त्यानुसार राष्ट्रवादीने न्यायालयात जाण्याचा इशारा दिला, तर काँग्रेसने प्रत्यक्षात कृती केली आहे़ गेले दोन दिवस या व्यायामशाळेसमोर स्वाभिमान वडापाव व कोंबडीवड्याच्या गाड्या लावण्यात आल्या होत्या़ तर काँग्रेसने दादरमध्ये कांदेपोहे विक्री स्टॉल्स लावले़ मात्र राणे यांचे स्टॉल्स दोन्ही वेळा उचलण्यात आले़ व्यायामशाळेच्या माध्यमातून अनेक नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप करीत राणे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे़ यामध्ये मुंबई महापालिका, राज्य सरकार आणि डीएम फिटनेस यांना प्रतिवादी करण्यात आले आहे़ सागरी नियंत्रण क्षेत्र कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या या व्यायामशाळेवर कारवाई करण्याच्या आपल्या मागणीकडे ‘मातोश्री’च्या दबावामुळे आयुक्त दुर्लक्ष करीत आहेत़ म्हणून आपण न्यायालयाचा आधार घेतल्याचे राणे यांनी याचिकेत म्हटले आहे़ (प्रतिनिधी)
खुल्या व्यायामशाळेविरोधात राणे कोर्टात
By admin | Published: July 24, 2015 2:56 AM