Join us  

राणेंच्या घोषणा युती सरकार पूर्ण करतेय

By admin | Published: October 24, 2015 11:06 PM

दीपक केसरकरांचा टोला : सी वर्ल्डची जागा बदलणार नाही

सावंतवाडी : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी विकासाच्या फक्त घोषणाच केल्या. मात्र, त्यांना त्या पूर्ण करता आल्या नाहीत. त्यांनी केलेल्या घोषणा पूर्ण करण्याचे काम युती सरकार करीत आहे. त्यामुळे राणे यांनी निश्चिंत राहावे, असा टोला राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी लगावला. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी सी-वर्ल्ड प्रकल्पाची जागा हलवणार नसल्याचेही स्पष्ट केले. यावेळी उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार, तहसीलदार बी. बी. जाधव, पंचायत समिती सदस्य अशोक दळवी, विनायक दळवी, संजय पेडणेकर, प्रकाश परब, शहरप्रमुख शब्बीर मणियार उपस्थित होते. पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले, सिंधुदुर्गचा पुढील काळात झपाट्याने विकास होणार आहे. अनेक प्रकल्प मार्गी लागणार आहेत. अनेक विकासकामांना निधी देण्यात येणार असून यांच्या निविदाही निघाल्याचे त्यांनी सांगितले. दोडामार्ग व वैभववाडी या ठिकाणी निवडणुका होत असून, यामध्ये शिवसेना-भाजप युतीचा विजय निश्चित आहे. मोठ्या प्रमाणात या दोन्ही तालुक्यांत विकासकामे करण्यात आली आहेत. दोडामार्गमध्ये मोर्ले पारगड रस्ता तसेच अन्य कामेही मार्गी लावण्यात आली आहेत. यापुढेही मोठ्या प्रमाणात विकासकामे करण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. माजी मु्ख्यमंत्री नारायण राणे यांनी माझ्यावर टीका करण्यापूर्वी आपण किती निधी आणला आणि आता आम्ही किती निधी देत आहोत याची पाहणी करावी. नुसते बिनबुडाचे आरोप करू नये. मात्र, त्यांचे दु:ख आम्ही समजू शकतो, पण त्यांनी आपल्या दु:खाचा राग इतरांवर काढू नये, असे सांगत सी-वर्ल्डची जागा आम्ही बदलणार नसून जागा मात्र निश्चित कमी करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच सी-वर्ल्ड, विमानतळाचे काम सुरू असून योग्यवेळी त्याची माहिती शासन देईल, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी) पंचायत समितीच्या इमारतीबाबत लवकरच निर्णय सावंतवाडी पंचायत समितीची इमारत ही मध्यवर्ती ठिकाणी बांधावी यासाठी शासन आग्रही असून, सावंतवाडी पंचायत समितीची ही इमारत तालुका स्कूल किंवा उपविभागीय कार्यालयाच्यासमोर होण्यासाठी आमचा प्रयत्न राहील. तसे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.