मुंबई : अलीकडेच वेदांत-फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातमध्ये गेला आणि त्यावरून राजकीय रण पेटले. सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप-प्रत्योरापाच्या फैरी झाडल्या. अर्थात एखादा प्रकल्प महाराष्ट्रातून अन्य राज्यात जाण्याची ही काही पहिली वेळ नाही. पण जेव्हा अशापद्धतीने प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेले त्यावेळी विरोधी पक्षात असलेले नेते या संदर्भात आक्रमक प्रतिक्रिया देत होते.
अशाच एका प्रसंगी त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेले आणि सध्या भाजपात असलेले नारायण राणे यांनी पंतप्रधान मोदी व देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. मोदी मुंबईचे महत्त्व कमी करत आहेत आणि त्याला देवेंद्र फडणवीस साथ देत आहेत, अशा शब्दांत राणेंनी आपल्या आक्रमक शैलीत प्रतिक्रिया दिली होती. राणे यांचा हा व्हिडीओ ट्विटरवर सध्या जोरात फिरत आहे. याला हजारो लाईक्स आणि रिट्विटस् मिळत आहेत. काही लोक आवर्जून ट्विटरची ही लिंक आपापल्या व्हॉटस्अॅप ग्रुपमध्ये शेअर करून विरोधी मतांच्या मित्रांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्नही करत आहेत. हल्ली सोशल मीडिया फोफावल्यामुळे जुन्या जुन्या गोष्टींचे व्हिडीओ सहजच उपलब्ध होतात अन् यामुळे पंचाईत होते ती पक्ष आणि भूमिका बदलणाऱ्या नेत्यांची!